पिंपरी चिंचवड : “ब’ प्रभागात दोन महिन्यांत अडीच हजार कारवाया, दोन लाख रुपयांचा दंड

पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिकेकडून ब क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाला तीन नवीन वाहने देण्यात आली आहे. यामुळे कारवाईचा वेग वाढला आहे. गेल्या दोन महिन्यांत दोन हजार 530 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी तीन याप्रमाणे 24 नवीन मोठी वाहने खरेदी केली. यामुळमहापालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवायांना चांगलीच धार आली आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात ब क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तब्बल दोन हजार 530 जणांवर कारवाया केल्या आहेत. यामध्ये 139 हातगाड्या, 8 टपरी, 24 टेम्पो, 119 फ्लेक्स, 48 जाहीरात बोर्ड, 50 वजनकाटे, सात खूर्च्या, 24 छत्री, 16 टेबल, 14 टायर, 10 काऊंटर, 18 स्टुल, 1 हजार 549 इलेक्ट्रिक पोलवरील किऑक्स आणि 504 इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
यापैकी काही वस्तू मूळ मालकांना दंड आकारून परत केल्या आहेत. याच दोन महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने तब्बल दोन लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पत्राशेडवरही कारवाई
फेरीवाले, दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी देण्यात आलेल्या या वाहनांचा उपयोग शहरातील पत्राशेडवर होणाऱ्या कारवाईच्यावेळी देखील करण्यात आला. जवळपास आठवडाभर पत्राशेडवर कारवाई सुरू होती. यापुढेही जोमाने या कारवाया सुरू राहणार आहेत.





