बकरी चोरीच्या आरोपावरून मारहाण; दोघांचा मृत्यू

जमशेदपूर – जमशेदपूरच्या ग्रामीण भागात मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. बकरी चोरीच्या आरोपावरून दोघांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. चाकुलियाच्या चोडीसा गावात ही खळबळजनक घटना घडली. माहिती मिळताच डीएसपी आणि पोलिस स्टेशनचे प्रभारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी काही गावकऱ्यांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी करत आहेत.
काल रात्री दोन लोक घरात घुसले होते. कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरडा करताच शेजारी जमा झाले. शेजाऱ्यांच्या मदतीने दोघांनाही पकडण्यात आले. गावकऱ्यांनी दोघांवरही बकरी चोरल्याचा आरोप करून मारहाण केली. या हाणामारीत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात आणण्यात आले.
दुसऱ्या व्यक्तीचाही रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. संशयाच्या आधारे काही गावकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघांचीही ओळख पटविण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या घटनेत सहभागी असलेल्या काही ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी करत आहेत.





