Satara | शिक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

सातारा, (प्रतिनिधी) – शाळेच्या आवारात जेसीबी व डंपर चालकाला वाहनांचा आवाज कमी करा, असे म्हटल्याच्या कारणातून दोन शिक्षकांना दोघांनी वर्गातून ओढून काढात थेट मारहाण केली. या घटनेने परिसरात व शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यात सोमनाथ धोत्रे व योगेश (पूर्ण नाव, वय, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तौफिक मुझम्मील शेख (वय 26, रा. सदरबझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते शाळेतील उपशिक्षक आहेत. ही घटना दि. 30 जुलै रोजी सातारा नगरपालिका उर्दु शाळा क्रमांक 12 येथे घडली आहे.
तक्रारदार शिक्षक तौफिक शेख हे शाळेत शिकवण्याचे काम करत आहेत. त्यावेळी शाळेच्या आवारात जेसीबी एमएच 08 एएक्स 0697 या क्रमांकाचा व डंपर त्याचा नंबर माहित नाही. हे दोन्ही वाहने बांधकामाचे क्रश सॅन्ड भरत होते. यामुळे मोठा आवाज होत होता.बराचवेळ हे काम सुरु राहिल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना अडथळा येऊ लागला.
वाहनांच्या वाढत्या आवाजामुळे तक्रारदार तौफिक शेख व मुख्याध्यापिका रेश्मा शेख हे तेथे गेले. त्यांनी मशीन बंद करा व वाहने पुन्हा शाळेच्या आवारात आणू नका. तसेच मातीचे ढीग शाळेच्या आवारात टाकू नका, असे सांगितले. यावर जेसीबी चालक व डंपर चालकाने शिक्षकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
वर्गातून बाहेर ओढून मारहाण
‘तुम्ही शिकवायचे काम करा. तुम्हाला अडचण काय आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. तुम्ही शाळा कशीच चालवता ते बघतो,’ असे म्हणत संबंधितांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर तक्रारदार शेख यांना मारहाण करण्यात आली.
या घटनेने परिसर हादरुन गेला. काही वेळानंतर वाद थांबल्यानंतर तक्रारदार शिक्षक शेख हे मुलांना वर्गात पुन्हा शिकवण्यासाठी गेले. त्यावेळी संशयितांनी पुन्हा तक्रारदार शिक्षक यांना वर्गातून बाहेर ओढून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मुख्याध्यापिका यांनीही दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार दिली आहे.





