अजित गटाचे ट्विटर हॅण्डल सस्पेंड; काय आहे त्यामागचे कारण?

मुंबई – अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. एक अजित पवार गट आणि दूसरा म्हणजे शरद पवार गट. मात्र आता यातील अजित पवार गटाच्या अकाऊंटवर कारवाई झाली आहे. ट्विटर (एक्स) कडून अजित पवार गटाचं अधिकृत अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. त्यामुळे यावर कोणतीही पोस्ट दिसत नाही.
नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात आले आहे. NCPSpeaks1 नावाने अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल होतं. एकच नावाचं अकाऊंट असल्याने शरद पवार गटाने तक्रार केली होती. त्यानंतर ट्विटर हॅण्डल सस्पेंड करण्यात आले आहे. त्यानंतर अजित पवार गटाने देखील त्यांची बाजू ट्विटरला कळवली असून लवकरच ट्विटर हॅण्डल सुरू होईल अशी माहिती अजित पवार गटाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांना घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवार यांना आपलं समर्थन दिले आहे. तर काही आमदार अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तसेच अजित पवार गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्याकडे अर्जही दाखल करण्यात आले आहेत.





