सव्वीस हजार भगिनींनी पाठवली मुख्यमंत्र्यांना राखी

मोठी उलथापालथ होणार
भाजपचा असाही प्रचार
देवेंद्र फडणवीस यांचा महिला सक्षमीकरणाचा व्हॉईस मेसेज

आपत्ती निवारणातही मुख्यमंत्र्यांचा ऑनलाइन दौरा

संदीप राक्षे

सातारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताऱ्यातील सव्वीस हजार भगिनींनी राख्या पाठवून आपला स्नेहभाव प्रकट केला. राखी पाठवणाऱ्या प्रत्येक भगिनीशी मुख्यमंत्र्यांनी व्हॉईस मेसेजद्वारे संपर्क साधून तुमच्या विश्‍वासास नेहमी पात्र राहिल असे भावनिक उत्तर दिले. या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सात हजार भगिनींशी संपर्क साधत आपत्ती निवारणाच्या गडबडीत ही महाजनादेश यात्रा बाजूला ठेऊन वेगळा ऑनलाइन दौरा पूर्ण केला. भाजपा महिला आघाडीच्यावतीने सातारा जिल्ह्यातून तब्बल पंचवीस हजार राख्या पाठवण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते.

महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता कचरे व तालुकानिहाय अकरा महिला संघटकांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. सातारा जिल्ह्यातून तब्बल 26474 भगिनींच्यावतीने राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आल्या. 9227192271 या क्रमांकावर मिसकॉल देऊन सातारा जिल्ह्याचा प्रोफाईल अलर्ट देण्यात आला होता. ज्या भगिनींना थेट राखी पाठवण्यात जमली नाही त्यांनी ऑनलाइन राखी मुख्यमंत्र्यांना पाठवून राखी पौर्णिमा साजरी केली. वेबसाईटवर तब्बल तीन हजार भगिनींनी मुख्यमंत्र्यांना ई राखी बांधली.

सातारा जिल्ह्यातल्या अठ्ठावीस हजार भगिनींच्या स्नेहाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घेत सर्व भगिनींना चोवीस सेकंदाचा व्हॉईस मेसेज पाठवला आहे. तुमची राखी मला सतत माझ्या कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करून देत राहिल. तुमच्या प्रती असणाऱ्या जबाबदारीला मी कधीच चुकणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत सर्व भगिनींना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. ज्या महिलांनी मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवल्या त्यांच्या भ्रमणध्वनीवर भाजपच्यावतीने महिला सक्षमीकरण योजनेची माहिती व्हॉईस मेसेजद्वारे भाजपच्या मीडिया सेलकडून दिली जाणार आहे.

राज्यातील 288 मतदारसंघात समन्वयक ठरणारी साधारण पंचावन्न दिवसांची मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची तीव्रता लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय अजेंडा बाजूला ठेवून पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणच्या आपत्ती निवारणात लक्ष घालावे लागले. त्यातही नारळी पौर्णिमेचे निमित्त साधून मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यातील सव्वीस हजार भगिनींशी संवाद साधण्याचा ऑनलाइन दौरा पूर्ण केला. सातारा जिल्ह्यातील भाजपच्या दीड हजार बूथ केंद्रांवर मुख्यमंत्र्यांची महिला सक्षमीकरणाची क्‍लीप वाजवली जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील छत्रपतींचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे भाजपवासी झाल्यानंतर विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाचे काही अटी शर्तीवर नक्की झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील आपला मुक्काम वाढवत स्थगित महाजनादेश यात्रा काही काळ प्रलंबित ठेवली आहे. पक्षश्रेष्ठींना रामराजेंच्या शर्ती किती रुचणार याच्या चाचपणी बैठका सुरू असून त्यांच्या प्रवेशासह सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने काही महत्वाचे निर्णय होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी काळात सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)