प्रभात वृत्तसेवा जांबूत – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरामध्ये मंगळवारी (दि. ४) रोजी रात्री उशिरा नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे. मागील वीस दिवसांमध्ये याच बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे, भागुबाई जाधव आणि रोहन बोंबे यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.वीस दिवसांत तीन मृत्यू झाल्यामुळे जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमधील बिबट प्रवण क्षेत्रात मोठा जनक्षोभ उसळला होता. ग्रामस्थांनी बेल्हे-जेजुरी राज्यमार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग रोखून तीव्र आंदोलन केले होते. तसेच, संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या गस्ती वाहन आणि स्थानिक बेस कॅम्प इमारतीची जाळपोळही केली होती.रोहन बोंबे याच्या मृत्यूनंतर पुणे-नाशिक महामार्ग सुमारे २१ तास रोखून धरल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी नरभक्षक बिबट्यास ठार करण्याची तातडीने परवानगी घेतली. वनविभागाने पुणे येथील रेस्क्यू संस्थेचे पशु चिकित्सक डॉ. सात्विक पाठक आणि दोन शार्प शूटरसह टीम घटनास्थळावर तैनात केली. दिवसभर कॅमेरा ट्रॅप आणि ठशांचे निरीक्षण केल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये शोध घेण्यात आला. घटनास्थळापासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर पाच ते सहा वर्षांचा नर बिबट प्रफुल्ल बोंबे यांच्या शेतात बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याने बिबट्याने चवताळून शार्प शूटर व वनकर्मचारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोळी झाडल्याने बिबट मारला गेला. त्यानंतर या बिबट्याचे शव पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखवून शवविच्छेदनाकरिता माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले. जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही यशस्वी झाली असून, या दिलासादायक कारवाईबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अशाच प्रकारे कारवाई करून उर्वरित बिबटे जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.