भारतातील बालके पुरेशी झोप घेत नाहीत : सर्व्हेक्षणातून निघाला निष्कर्ष पुणे – टीव्ही आणि मोबाइलचा परिणाम बालकांच्या झोपेवर झाला असून, या दोन गोष्टींमुळे भारतातील बालके पुरेशी झोप घेत नसल्याचा निष्कर्ष एका सर्व्हेक्षणातून काढला आहे. एका कंपनीने “जागतिक निद्रा दिना’निमित्त “स्लीप10′ या आरोग्याविषयी जागृती करणाऱ्या उपक्रमांतर्गत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये देशातील बालक व प्रौढांमध्ये अपुरी झोप घेण्याचा आरोग्यासाठी हानीकारक ट्रेंड वाढत असल्याचे या सर्व्हेक्षणातून दिसून आले आहे. “लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य सुखसंपत्ती लाभे’ अशी उक्ती अगदी शाळेपासूनच सर्वांना तोंडपाठ असते. ती शिकल्यानंतर लहानमुले त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्नही करतात, परंतु मोबाइल आणि टीव्ही या दोन गोष्टींच्या अतिवापरामुळे लहानमुलांमधील “शांत झोप’च पळून गेली आणि ही उक्ती कधीच मागे पडली आहे. सर्व्हेक्षणामध्ये सहभागी झालेले अंदाजे 58 टक्क्यांहून अधिक जण अगदी क्वचितच 10 वाजता झोपतात किंवा कधीही 10 वाजता झोपत नाहीत आणि अंदाजे 36 टक्के जण दिवसातून 6 तासांपेक्षा कमी झोपतात. सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, सर्व्हेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी केवळ 20 टक्के खरेच रात्री 10 वाजता झोपले. सहभागी बालकांपैकी 41 टक्के बालकांनी टीव्ही आणि फोन यांचा समावेश असणाऱ्या स्क्रीन टाइममुळे झोपण्याचा कालावधी पुढे ढकलला जात असल्याचे कबूल केले. तसेच 43 टक्के बालकांनी मध्यरात्रीनंतर झोपल्याचे सांगितले, तर आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते झोपण्यासाठी आदर्श वेळ रात्री साधारण 10 ही आहे. बालके आणि त्यांच्या झोपण्याच्या पद्धती आणि सवयी हा पालकांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. निरोगी राहण्यासाठी, दररोज 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी आणि योग्य झोप न घेतल्यास, शरीरात सायटोकाइन्स हे प्रोटिन निर्माण होत नाहीत. हे प्रोटिन संसर्ग आणि सूज यांच्यावर मात करते तसेच प्रभावीपणे प्रतिकारक्षमता निर्माण करते, अशी माहिती संशोधनातील निष्कर्षांबद्दल बोलताना, “इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस’चे डॉ. अभिजीत देशपांडे यांनी दिली. प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आणि विषाणू आणि आजार यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी झोप हा सर्वोत्तम पर्याय आहे. वेळेवर झोपणे आणि शरीराला जितकी गरजेची आहे तितकी विश्रांती देणे महत्त्वाचे आहे. या सर्व्हेक्षणानुसार, 58 टक्के हून अधिक बालके अगदी क्वचितच 10 वाजता झोपतात किंवा कधीही 10 वाजता झोपत नाहीत आणि 36 टक्के जण दिवसातून 6 तासांपेक्षा कमी झोपतात. देशामध्ये सध्या एका विषाणूमुळे चिंतेचे सावट निर्माण झाले असताना, प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी झोप हा एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. उपचारापेक्षा प्रतिबंध केलेला बरा आणि निरनिराळ्या प्रकारे सावधगिरी बाळगत असताना, बालके आणि किशोरवयीन यांच्या झोपेबद्दल योग्य काळजी घ्यायला हवी. एका कंपनीने “जागतिक निद्रा दिना’निमित्त “स्लीप10′ या आरोग्याविषयी जागृती करणाऱ्या उपक्रमांतर्गत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये देशातील बालक व प्रौढांमध्ये अपुरी झोप घेण्याचा आरोग्यासाठी हानीकारक ट्रेंड वाढत असल्याचे या सर्व्हेक्षणातून दिसून आले आहे.