Tutti Frutti: रंगीत आणि गोड टूटी-फ्रूटी पाहिली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. केक, आईस्क्रीम, कुकीज, मिल्कशेक किंवा बेकरी पदार्थांमध्ये वापरली जाणारी ही रंगीत टूटी-फ्रूटी (Tutti Frutti ) बाजारात सहज मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का, ही टूटी-फ्रूटी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते? विशेष म्हणजे यासाठी महाग फळांची गरज नसून कच्च्या पपईपासून स्वादिष्ट आणि रंगीत टूटी-फ्रूटी बनवता येते. कच्च्या पपईची चव सौम्य असल्यामुळे त्यात साखर आणि रंग सहज मिसळतात. त्यामुळे बाजारात मिळणारी बहुतेक टूटी-फ्रूटीदेखील कच्च्या पपईपासूनच तयार केली जाते. घरच्या घरी बनवलेली टूटी-फ्रूटी अधिक स्वच्छ आणि सुरक्षित असल्यामुळे मुलांसाठीही ती उत्तम पर्याय ठरू शकते. (Tutti Frutti) कच्ची पपई पौष्टिकतेनेही भरलेली असते. त्यात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. तसेच त्यात ‘पपेन’ नावाचं एन्झाइम असतं, जे पचन सुधारण्यास मदत करतं. वजन नियंत्रणात ठेवणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठीही कच्ची पपई फायदेशीर मानली जाते. Tutti Frutti: मुलांना आवडणारी रंगीत टूटी-फ्रूटी बनवा घरच्या घरी; रेसिपी आहे खूप सोपी घरच्या घरी टूटी-फ्रूटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य अगदी साधं आहे. यासाठी एक मध्यम आकाराची कच्ची पपई, दोन कप साखर, तीन कप पाणी, वेगवेगळे खाद्य रंग, एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स आणि एक मोठा चमचा लिंबाचा रस लागतो. Tutti Frutti सर्वप्रथम कच्ची पपई सोलून तिच्या बिया काढून टाका. त्यानंतर पपईचे छोटे चौकोनी तुकडे करा. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात पपईचे तुकडे ५ ते ७ मिनिटं हलके उकळून घ्या. मात्र तुकडे खूप मऊ होणार नाहीत याची काळजी घ्या. नंतर पाणी गाळून वेगळं करा. यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून पाक तयार करा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि व्हॅनिला इसेन्स घाला. आता उकडलेले पपईचे तुकडे या पाकात घालून १० ते १५ मिनिटं शिजवा, जेणेकरून गोडवा तुकड्यांमध्ये मुरेल. (Tutti Frutti) त्यानंतर पपईचे तुकडे वेगवेगळ्या वाट्यांमध्ये विभागा आणि प्रत्येकात वेगळा खाद्य रंग मिसळा. हे मिश्रण ७ ते ८ तास किंवा पूर्ण रात्र झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी तुकडे चाळणीत काढून अतिरिक्त पाक वेगळा करा आणि ट्रे किंवा प्लेटमध्ये पसरवून काही तास वाळू द्या. अशा प्रकारे घरच्या घरी तयार होईल स्वादिष्ट, रंगीत आणि मुलांना आवडणारी टूटी-फ्रूटी. ही टूटी-फ्रूटी केक, आईस्क्रीम, शेक किंवा मिठाईमध्ये वापरता येते.