पुणे जिल्हा | तळेगाव गावातून तुतारी सुसाट

तळेगाव ढमढेरे {मयूर भुजबळ} – शिरूर लोकसभेच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सलग दुसऱ्यांदा विजयाची तुतारी वाजली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत विजय मिळविला.
यामध्ये तळेगाव ढमढेरेमधून डॉ. अमोल कोल्हे यांना २१७२ मतांची आघाडी मिळाली. तळेगाव ढमढेरे गावात डॉ. अमोल कोल्हे यांना एकूण ४६१२ मत मिळाली तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना २४४० मत मिळाली.
शिरूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना 30000 मतांची आघाडी मिळाली होती. तालुक्यातील 105 गावांमधील तळेगाव ढमढेरे गावाने 2172 मतांची आघाडी दिली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, महिला तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पुणे जिल्हा सरचिटणीस यशवंत ढमढेरे, शिरूर तालुका महिलाध्यक्षा आरती भुजबळ, पुणे जिल्हा क्रीडाध्यक्ष अड. स्वप्नील ढमढेरे,
तर सहयोगी मित्रपक्ष असणारे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव भुजबळ, पंडित भुजबळ, जिल्हा क्रीडाध्यक्ष रवी ढमढेरे, काँग्रेसचे जेष्ठ नेते अरविंद ढमढेरे, काँग्रेस पुणे जिल्हा खजिनदार महेश ढमढेरे, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला तालुकाध्यक्षा चेतना ढमढेरे, शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष कैलास नरके,
आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे हे सर्व पदाधिकारी तळेगाव ढमढेरे गावातील असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. तालुक्याच्या राजकारणात गावातून कोणाला आघाडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
तळेगावसह परिसर तुतारीमय
शिवाजीराव आढळूराव पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी केलेले पक्षांतर मतदारांचे काही पचनी पडल्याचे दिसून आले नाही. तर डॉ. अमोल कोल्हे यांना तालुक्याचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटात शरद पवार यांना मानणारा मोठा शेतकरी वर्ग असल्याने त्याचे पडसाद निकालावर उमटले. तळेगाव ढमढेरेबरोबर धानोरे, विठ्ठलवाडी, कासारी, टाकळी भीमा या गावातूनही डॉ. अमोल कोल्हे यांना आघाडी मिळाली आहे.





