तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा पर्दाफाश: १०,००० पानांचे दोषारोपपत्र दाखल, पुजारी ते राजकीय कनेक्शन उघड!

Tuljapur Drug Case: तुळजापूर, जिथे लाखो भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात, त्या पवित्र नगरीत ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उघडकीस आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत असून, आता धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात तब्बल १०,००० पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. या प्रकरणात ३५ जणांना आरोपी ठरवण्यात आले असून, आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या तस्करीत पुजारी, राजकीय कार्यकर्ते आणि मोठ्या शहरांशी कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.
१०,००० पानांचे दोषारोपपत्र: कोण-कोण सामील?
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात सध्या ३५ जणांवर आरोप ठेवण्यात आले असून, यापैकी १४ जणांना अटक झाली आहे, तर २१ जण फरार आहेत. दोषारोपपत्रात बँक व्यवहार, आरोपींचे एकमेकांशी संपर्क, आणि तस्करीची साखळी कशी तयार झाली याची सविस्तर माहिती आहे. मुख्य आरोपी संगीता गोळे यांच्यासह इतर आरोपींनी कशा पद्धतीने हे रॅकेट चालवले, याचा तपशील यात नमूद आहे. याशिवाय, मुंबई, सोलापूर आणि पुणे येथील ड्रग्ज तस्करीशी या प्रकरणाचा संबंध असल्याचेही समोर आले आहे. दोषारोपपत्रात आरोपींचे जबाब, कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर), आणि त्यांचे रोल यांची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा घटनाक्रम:
१५ फेब्रुवारी २०२५: तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत २.५ लाख रुपये किमतीचे ५९ पुड्या एमडी ड्रग्ज जप्त केले. यावेळी काही आरोपींना अटक झाली.
फेब्रुवारी २०२५ अखेर: तपासात ड्रग्ज तस्करीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे उघड झाले. मुख्य सूत्रधार मानली जाणारी संगीता गोळे मुंबईतून अटक.
मार्च २०२५: स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे, संतोष खोत यांच्यासह आणखी काही आरोपींना अटक. संगीता गोळेच्या बँक खात्यातून ५ कोटींचे व्यवहार आणि सोने जप्त.
मार्च २०२५: फरार आरोपींचा शोध सुरू; १० नवीन नावे समोर, फरार आरोपींची संख्या २१ वर. राजकीय कार्यकर्ते आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर झाल्याचे उघड.
एप्रिल २०२५: तुळजाभवानी मंदिरातील १३ पुजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करीत सहभाग असल्याचा धक्कादायक खुलासा.
१५ एप्रिल २०२५: धाराशिव सत्र न्यायालयात १०,००० पानांचे दोषारोपपत्र दाखल.
या प्रकरणाने तुळजापूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. पुजारी ते राजकीय कनेक्शनपर्यंतच्या या रॅकेटचा पूर्ण पर्दाफाश होण्याची प्रतीक्षा आता सर्वांना आहे.

