बेल्हे -जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची संसतधार सुरू असल्याने येथील नाले, बंधारे, पाझर तलाव तुडुंब भरले असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. राजुरी, उंचखडक, बेल्हे, रानमळा, साकोरी, गुंजाळवाडी, अणे, पेमदरा, नळवणे, शिंदेवाडी, आनंदवाडी आदी परिसरात जलयुक्त शिवार योजना परिसरात राबवली. योजनेअंतर्गत पाझर तलाव, नाला खातेलीकरण कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांची कामे मोठ्या संख्येने झाली आहेत. तर गावागावांतील ओढ्यांवर ठिकठिकाणी बंधारे बांधले. हे बंधारे बांधल्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी त्यात साचू लागल्याने गेल्या चार वर्षांपासून पाणीटंचाई जाणवत नाही. या परिसरात असलेल्या विहिरी, पाझर तलाव, बोअरवेल, हातपंप आज ही पाण्याने भरले आहेत. पूर्वी या परिसरातील शेतकरी फक्त बाजरी व ज्वारीचेच पीक घेत असत मात्र जलयुक्तच्या कामांमुळे ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. दरम्यान, या परिसरात जलयुक्त योजनेंची कामे योग्य ठिकाणी घेण्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार व माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांचे मोठे योगदान आहे.