संसदेत पंतप्रधानांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न – पीएम मोदींचा आरोप

नवी दिल्ली – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी आपला निकाल दिला आहे आणि आता पुढील पाच वर्षे सर्व राजकीय पक्षांनी देशासाठी एकत्रितपणे लढले पाहिजे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अर्थसंकल्प पुढील पाच वर्षांच्या प्रवासाची दिशा ठरवेल आणि २०४७ मध्ये ‘विकसित भारत’चे स्वप्न पूर्ण करण्याचा पाया घालेल. प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींनी काही पक्षांच्या “नकारात्मक राजकारणा”वरही टीका केली आणि त्यांनी आपले अपयश लपवण्यासाठी संसदेच्या वेळेचा वापर केला असा आरोप त्यांनी केला.
गेल्या अधिवेशनात संसदेत विरोधकांनी सरकारचा व पंतप्रधानांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांवरही जोरदार निशाणा साधला आणि लोकशाहीत अशा रणनीतीला स्थान नाही असे ते म्हणाले. जनतेला दिलेल्या हमींची अंमलबजावणी करण्यासाठी आपले सरकार पुढे जात असल्याचे मोदी म्हणाले.
हा अर्थसंकल्प अमृत काळातील एक महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. आम्हाला मिळालेली पाच वर्षांची संधी, हा अर्थसंकल्प त्या प्रवासाची दिशा ठरवेल तसेच २०४७ मध्ये विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा पाया घालेल, असे मोदी म्हणाले. एखादे सरकार सतत तीन वेळा सत्तेवर येण्याचा प्रसंग ६० वर्षांनंतर आला आहे असेही त्यांनी नमूद केले.





