नवी दिल्ली – जानेवारीमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी सर्व जगाविरोधात व्यापार युद्ध पुकारले. अतार्किक कारण दाखवून अनेक देशाविरोधात आयात शुल्क वाढविले होते. अशा परिस्थितीत जागतिक व्यापारावर याचा नकारात्मक परिणाम होईल असे समजले जात होते. मात्र प्रत्यक्षात 2025 मध्ये जागतिक व्यापार सात टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. ट्रम्प यांनी इतकी आक्रमक वर्तणूक केली की, अनेक देशांना त्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करणेही अवघड जात होते. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये जागतिक व्यापार इतिहासात पहिल्यांदाच 35 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचला आहे. 2024 च्या तुलनेत हे प्रमाण सात टक्क्यांनी जास्त आहे. याचा अर्थ ट्रम्प यांच्या दादागिरीचा जागतिकीकरणावर किंवा जागतिक व्यापारावर नकारात्मक परिणाम होण्याऐवजी सकारात्मक परिणाम झाला असल्याचे दिसून येते. व्हाइट हाऊस व्यापारावर कर लावू शकते. मात्र व्यापार बंद करू शकत नाही. तंत्रज्ञान, बाजारपेठा आणि मानवी सहकार्य जागतिक व्यापार विविध मार्गाने पुढे नेत आहे. ट्रम्प यांची घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर 2025 च्या पूर्वार्धात विविध देशातील कंपन्यांनी आयात शुल्काची अंमलबजावणी होण्याअगोदर आपल्या वस्तू विविध देशात पाठविण्याची घाईगडबड केली होती. मात्र नंतर परिस्थिती सुरळीत होत गेली. आयात शुल्कामुळे वस्तूच्या व्यापारावर थोडाफार परिणाम होऊ शकतो. 1930 मध्ये अशा आयात शुल्काचा परिणाम जास्त झाला होता. मात्र आता वस्तूंबरोबरच सेवा क्षेत्राचा व्यापार वाढला आहे. वस्तूची निर्यात कमी होत असली तरी क्लाऊड कॉम्प्युटींग कॉन्ट्रॅक्ट किंवा सेमी कंडक्टर चीप डिझाईनच्या व्यापारावर अमेरिकेचे नियंत्रण राहू शकत नाही. 2025 मध्ये सेवा क्षेत्रातचा व्यापार नऊ टक्क्यांनी वाढला. शिवाय अमेरिकेने जर स्वतःच्या देशात टी-शर्ट तयार करून विकण्याचे ठरविले तर इतर कच्चा माल अमेरिकेला लागतो. या मालाच्या किमती विविध देशांनी अगोदरच वाढवून ठेवल्यामुळे या देशांच्या एकूण व्यापारावर त्याचा फार परिणाम झालेला नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यापाराला पायबंद घालण्यात कठीण झाले आहे. आफ्रिकेतील धातूंची मागणी वाढली आहे. तैवानमधील सेमीकंडक्टरची विक्री वाढली आहे. जपान मधील डाटा सेंटर साठीच्या गॅसटर्बाइनची विक्री वाढली आहे याकडे अमेरिकेला असाहाय्यपणे पहावे लागत आहे. अमेरिका स्वतःबरोबरचा व्यापार कमी करत असली तरी इतर देश परस्परादरम्यानचा व्यापार वाढवित आहे. याचा प्रत्यक्ष फटका अमेरिकेलाच बसत आहे. द कोरीयाला पहिल्या सहा महिन्यात त्रास झाला. मात्र प्रथमच 2025 मध्ये द कोरीयाची निर्यात 7.37% वाढून 700 अब्ज डॉलरवर गेली आहे. व्यापार स्वतःचा मार्ग विविध अडचणीतून शोधत असतो हे यातून स्पष्ट झाले आहे. या वर्षात दक्षिण गोलार्धातील देशांचा व्यापार जागतिक व्यापाराच्या तुलनेत वाढला आहे. तर पूर्व आशितील व्यापार दहा टक्क्यांनी वाढला आहे. अमेरिकेने सर्वच देशाविरोधात आयात शुल्क वाढविलेले नाही. त्यामुळे कमी आयात शुल्क असलेल्या देशाच्या माध्यमातून अमेरिकेत निर्यात चालूच आहे. 2026 मध्ये अशाच प्रकारचे प्रसंग जागतिक व्यापारासमोर येणार आहेत आणि यातूनही देशोदेशीचे निर्यातदार मार्ग काढतील असे समजले जाते.