ट्रंपचा टॅरिफ झटका! रुपया 87.82 वर, आयात महागणार, अर्थव्यवस्थेला धक्का?

मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह 70 देशा विरोधात 10 ते 50 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सात ऑगष्टपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक चलन बाजारामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.
या अवस्थेत भारताला आयात महागात पडण्याची शक्यता असल्यामुळे आयातदार डॉलरची मागणी वाढवीत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून रुपयाच्या मूल्यात घसरण कायम आहे. मंगळवारी रुपयाचा भाव 16 पैशांनी घसरून 87 रुपये 82 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व बँक बराच हस्तक्षेप करीत असूनही रुपयाचा भाव घसरत असल्याचे दिसून येत आहे.
याचा परिणाम फक्त भारताच्या रुपयावरच नाही तर इतर वेगाने विकसित होणार्या देशाच्या चलनावरही होत असल्याचे चलन बाजारातील व्यापार्यांनी नमूद केले. भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची गुंतवणूक परत जात असल्यामुळेही रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे. मात्र भारताकडे सातशे अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे. अशा परिस्थितीत रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व बँकेकडे बर्याच उपाययोजना शिल्लक असल्याचे समजले जाते.





