नवी दिल्ली – अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रमुख स्पर्धक असतील, असे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी म्हटले आहे. निवडणुकीची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत आपल्याबरोबर ट्रम्प हे संयुक्तपणे मुख्य स्पर्धक असतील. जर आपल्याला रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळू शकली नाही, तर ट्रम्प यांना आपला पाठिंबा असेल. मात्र अध्यक्षपदाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पदावर काम करण्यास आपण उत्सुक नसल्याचे रामास्वामी यांनी म्हटले आहे.
आपण देशाला एकसंध करू शकतो, असा विश्वास रामास्वामी यांना वाटतो. मात्र जर ट्रम्प यांना अध्यक्षपद मिळाले, तर त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात उपाध्यक्ष म्हणून काम करण्यास त्यांची तयारी नाही. आपण ट्रम्प यांच्यापेक्षा निम्म्या वयाचे आहोत. त्यामुळे आपल्यात अधिक उर्जा निश्चितच आहे. अध्यक्ष झाल्यास आपण ट्रम्प यांना व्हाईट हाऊसचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त करू. असेही ते म्हणाले.
बुधवारी झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या पहिल्या उघड चर्चेनंतर रिपब्लिकन पक्षाकडून दोन जणांना संयुक्तपणे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, अशी अफवा ट्रम्प यांच्या गोटातून पसरवली जाऊ लागली आहे. ट्रम्प यांच्याकडूनही रामास्वामी यांचे कौतुक केले जाते आहे. या खुल्या चर्चेमध्ये ट्रम्प अनुपस्थित होते. तर चर्चेत रामास्वामी यांची सरशी झाल्याचे चित्र होते.