Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी Foreign Corrupt Practices Act 1977 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 50 वर्ष जुना हा कायदा रद्द करण्यात आल्याने भारतीय उद्योजक गौतम अदानी व अदानी ग्रुपला मोठा दिलासा मिळणार आहे. याच कायद्यांतर्गत अदानी ग्रुपविरोधात लाच प्रकरणात चौकशी केली जात होती. हा कायदा रद्द करण्यात आल्यानंतर अदानी इंटरप्राइजेस आणि अदानी ग्रीन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आदेशात सांगितले आहे की, परदेशात व्यापार मिळवण्यासाठी परदेशी अधिकाऱ्यांना दिलेल्या लाचेबद्दल खटला चालवू नये. त्यामुळे आता अदानींविरोधातील खटला आपोआपच रद्द होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प पहिल्या कार्यकाळातच हा कायदा रद्द करणार होते. त्यांचे म्हणणे होते की, या कायद्यामुळे संपूर्ण जग अमेरिकेची खिल्ली उडवत आहे. हा कायदा अमेरिकन कंपन्यांना व्यापार विस्तार करण्यापासून रोखतो. स्पर्धेच्या या युगात अशा प्रकारच्या कायद्याचा काहीही उपयोग नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अटॉर्नी जनरलला आदेश देत नवीन नियमांनुसार या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. 2024 मध्ये जस्टिस डिपार्टमेंट आणि सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने या कायद्यांतर्गत 26 प्रकरणं दाखल केली होती. या अंतर्गत 31 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. आता हा कायदाच रद्द झाल्याने अदानी ग्रुपसह या सर्व कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी गौतम अदानींसह 8 जणांवर कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप लावण्यात आले होते. अदानींच्या कंपनीने भारतात रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट्स बेकायदेशीर मार्गाने मिळवले होते. यासाठी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना मोठी लाच दिली गेली, असा आरोप केला जात आहे. या प्रकरणात 8 जणांवर आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे.