संयुक्त राष्ट्रे : बेल रुसचे हुकुमशहा अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मूर्ख बनवत आहेत. ल्युकाशेंको यांच्यापासून ट्रम्प यांनी सावध रहावे, अशा शब्दात बेलारुसच्या विरोधी नेत्या स्वात्लाना त्सिखानौस्काया यांनी ट्रम्प यांना धोक्याचा इशारा दिला आहे. बेलारुसचे अध्यक्ष हे युरोपातील अखेरचे हुकुमशहा म्हणून ओळखले जातात. कैद्यांच्या सुटकेच्या नावाखाली ट्रम्प यांना मूर्ख बनवले जाते आहे, असे त्या म्हणाल्या. गेल्या ३ दशकांपासून तुरुंगात असलेल्या काही राजकीय कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात अमेरिकेचे बेलारुसबरोबरचे संबंध सुधारता येऊ शकतील. अमेरिकेकडून निर्बंध शिथील केले गेल्याने बेलारुसला आपल्या बोईंग आणि अन्य विमानांसाठीच्या भागांची खरेदी करता येऊ शकेल, असेही ट्रम्प यांनी सुचवले होते. बेलारुसचे अध्यक्ष ल्युकाशेंको यांच्याबरोबर आपले चांगले संबंध असल्याचेही ट्रम्प म्हणाले होते. युरोपीय जग ज्यांना टाळते अशा नेत्याला पुन्हा भेटायला आपण उत्सुक आहोत, असेही ट्रम्प म्हणाले होते. त्यांच्या आवाहनानंतर अलिकडच्या काळात एकूण ५१ कैद्यांना सोडण्यात आले आणि लुकाशेन्को यांनी गेल्या वर्षभरात ३०० हून अधिक लोकांना सोडले आहे. या बद्दल विरोधकांनी आनंद व्यक्त केला. पण ल्युकाशेंको यांच्या हेतूबद्दल त्सिखानौस्काया यांनी शंका उपस्थित केली आहे. तब्बल १,२०० राजकीय कैदी तुरुंगात ल्युकाशेंको यांनी तब्बल १,२०० राजकीय कैद्यांना तुरुंगात टाकले असल्याचे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. तुरुंगात असलेल्या नेत्यांमध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या लेखिका अलीस बियालियात्स्की आणि अन्य वरिष्ठ विरोधी नेत्यांचाही समावेश आहे. स्वात्लाना त्सिखानौस्काया यांनी ल्युकाशेंको यांच्याविरोधात २०२० मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. ल्युकाशेंको यांनी सहाव्यांदा ही निवडणुक लढवली आणि जिंकल्याचा दावाही केला होता. त्यांच्याविरोधात देशभर झालेले जनआंदोलन त्यांनी चिरडून टाकले होते. त्यानंतर त्सिखानौस्काया या देश सोडून परागंदा झाल्या होत्या. ल्युकाशेंको यांनी युक्रेनविरोधातल्या युद्धात रशियाला मदत केली आहे. त्यांच्याबरोबरच्या मैत्रीमुळे पुतीन यांनी रशियाची अण्वस्त्रे बेलारुसमध्ये ठेवली आहेत.