Trump phone call leaked | Donald Trump | WhatsApp : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांच्यातील फोन संभाषण लीक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. हा कॉल १४ ऑक्टोबर २०२५ रोजी व्हॉट्सअॅपवर झाला होता, आणि त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग व ट्रान्सक्रिप्ट ब्लूमबर्गने प्रसिद्ध केली आहे. या संभाषणात विटकॉफ यांनी उशाकोव्ह यांना, “ट्रम्पसोबत कामे सुरळीत पार पाडण्यासाठी खुशामत करणे गरजेचे आहे” असे सांगितल्याचे समोर आले आहे. हा कॉल लीक झाल्यावर अनेकांनी थेट व्हॉट्सअॅपच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यामुळे ॲपमध्ये काहीतरी मोठी त्रुटी आहे असं सगळ्यांनाच वाटते. ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’ असूनही कॉल आणि मेसेज लीक कसे होतात? व्हॉट्सअॅपनुसार, तुमचा मेसेज किंवा व्हॉइस नोट केवळ पाठवणारा आणि प्राप्त करणारा व्यक्तीच वाचू आणि ऐकू शकतो. मध्ये व्हॉट्सअॅप, इंटरनेट प्रदाता किंवा सर्व्हर कोणतेही मेसेज पाहू शकत नाही. म्हणून तांत्रिकदृष्ट्या व्हॉइस नोट्स किंवा कॉल लीक होणे अशक्य वाटते. पण प्रत्यक्षात असे होते आणि त्यासाठी अनेक कारणे आहेत. ते कोणते? याबद्दल जाणून घेऊयात…. व्हॉट्सअॅप मेसेज लीक होण्याची सर्वात सामान्य कारणे :- 1) रिसिव्हर स्वतःच मेसेज लीक करतो – हे सर्वात मुख्य कारण ज्याला तुम्ही मेसेज पाठवला, तोच व्यक्ती: स्क्रीन रेकॉर्ड करू शकतो, ऑडिओ सेव्ह करून शेअर करू शकतो आणि मेसेज पुढे फॉरवर्ड करू शकतो. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन यात काहीही मदत करू शकत नाही, कारण फाईल आधीच त्याच्या फोनवर असते. 2) फोन हॅक, मालवेअर किंवा स्पाय अॅप फोनमध्ये जर स्पायवेअर, कीलॉगर किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग मालवेअर इन्स्टॉल झाले असेल, तर तुमच्या सर्व व्हॉइस नोट्स, कॉल रेकॉर्डिंग आणि मेसेजेस थेट हॅकरकडे पोहोचू शकतात. हे लीक होण्याचे सर्वात धोकादायक कारण आहे. सर्वाधिक घटनांमध्ये हाच धोका दिसून आला आहे. 3) फोन हरवणे किंवा दुसऱ्याने वापरणे फोन अनलॉक असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या हातात गेला तर, WhatsApp उघडणे, चॅट वाचणे आणि व्हॉइस नोट्स सेव्ह/फॉरवर्ड करणेअत्यंत सोपे होते. 4) Google Drive / iCloud बॅकअप सुरक्षित नसणे WhatsApp Backup: Android (Google Drive) / iPhone (iCloud) हे बॅकअप नेहमी एन्क्रिप्टेड नसतात (जोपर्यंत “End-to-end Encrypted Backup” सक्रिय करत नाही). जर कुणी तुमच्या Google/iCloud अकाउंटमध्ये शिरले, तर संपूर्ण WhatsApp बॅकअप वाचता येऊ शकतो. अनेक मोठ्या चॅट लीक प्रकरणांमध्ये हेच प्रमुख कारण होते. 5) ‘WhatsApp Web’चा गैरवापर जर कुणी तुमचा QR कोड स्कॅन करून WhatsApp Web वापरत असेल तर: तुमचे चॅट, फाईल्स, व्हॉइस नोट्स हे सर्व रिअल-टाइममध्ये पाहता येतात. आणि हेही वारंवार घडते. 6) ओटीपी फसवणूक आणि कमजोर पासवर्ड Google/iCloud चा कमकुवत पासवर्ड, एकच पासवर्ड सर्वत्र वापरणे, ओटीपी शेअर करणे यामुळे हॅकर्सना बॅकअप आणि फोनमध्ये सहज प्रवेश मिळू शकतो. व्हॉट्सअॅप स्वतः मेसेज लीक करते का? तर याचे उत्तर आहे, नाही.! कारण एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे WhatsApp किंवा Meta तुमचे मेसेजेस किंवा कॉल ऐकू शकत नाही. लीकची खरी कारणे बहुतांश युजरच्या डिव्हाइसशी संबंधित असतात. आणि ती काळजी घेणे हे मुख्य युजरचे काम आहे. व्हॉइस मेसेज आणि कॉल सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? 1) End-to-end Encrypted Backup सुरू करा. Settings → Chats → Chat Backup → End-to-end Encrypted Backup (ON) 2) फोनला मजबूत पासवर्ड/लॉक ठेवा PIN / Fingerprint / Face ID 3) WhatsApp Web तपासा Settings → Linked Devices → संशयास्पद डिव्हाइस → Logout 4) अनोळखी APK / थर्ड-पार्टी अॅप्स टाळा 5) संवेदनशील व्हॉइस मेसेज शक्यतो पाठवू नका. कारण रिसिव्हरकडे फाईलची पूर्ण कंट्रोल असते. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (WhatsApp) हॅक जवळजवळ अशक्य आहे. पण वापरकर्त्यांच्या फोन, बॅकअप, WhatsApp Web किंवा रिसिव्हरमुळे मेसेज लीक होतात. राष्ट्राध्यक्षांच्या दूतांचा कॉल लीक होणे हे याचे ताजे उदाहरण आहे. त्रुटी WhatsApp मध्ये नाही, तर युजरच्या डिव्हाइस सिक्युरिटीमध्ये आहे.