US-Iran war news – इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पुढील वाटचालीवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात अत्यंत तणावपूर्ण फोन कॉल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणवर पुन्हा लष्करी हल्ले सुरू करण्याऐवजी वॉशिंग्टन सध्या राजनैतिक कराराच्या बाजूने झुकल्याचे दिसत असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. झालेल्या या दूरध्वनी संभाषणाानंतर पंतप्रधान नेतान्याहू ‘अत्यंत संतापले’ होते, असा दावा एका अमेरिकतील एका माध्यम समुहाने केला आहे. इस्रायली सूत्रांनुसार, नेतान्याहू हे इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी आणि तेथील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करून तेथील राजवट कमकुवत करण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार युद्ध सुरू करण्यास उत्सुक आहेत. मात्र, कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या अरब राष्ट्रांच्या विनंतीनंतर ट्रम्प यांनी मंगळवारी नियोजित असलेले इराणवरील हल्ले तूर्तास पुढे ढकलले. कतार आणि पाकिस्तानने इतर प्रादेशिक मध्यस्थांच्या मदतीने एक सुधारित शांतता करार तयार केला असून, ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या या राजनैतिक सवलतीमुळे इस्रायली प्रशासनात तीव्र निराशा पसरली आहे. (US-Iran war news) डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र अजूनही कराराची आशा जिवंत ठेवली आहे. कनेक्टिकटमधील कोस्ट गार्ड अकादमीतील कार्यक्रमानंतर बोलताना ट्रम्प म्हणाले, अमेरिका आणि इराण सध्या करार होणे आणि युद्ध पुन्हा सुरू होणे याच्या अगदी सीमारेषेवर उभे आहेत. जर आम्हाला इराणकडून १०० टक्के योग्य उत्तरे मिळाली नाहीत, तर गोष्टी खूप वेगाने घडतील आणि आम्ही युद्धासाठी पूर्णपणे तयार आहोत. या मुद्द्यावर नेतान्याहू अखेर मी जसे सांगेन, अगदी तसेच वागतील, असा दावा देखील ट्रम्प यांनी केला आहे. १४-कलमी प्रस्ताव आणि ‘आशयपत्र’ (US-Iran war news) दुसरीकडे, इराणने सुधारित प्रस्तावाचा आढावा घेत असल्याचे मान्य केले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या इराणच्या १४-कलमी प्रस्तावावर आधारित चर्चा सुरू असून, पाकिस्तानचे गृहमंत्री सध्या या मध्यस्थीसाठी तेहरानमध्ये ठाण मांडून आहेत. अमेरिकन सूत्रांनुसार, मध्यस्थ सध्या एका आशयपत्रावर काम करत आहेत. या पत्रावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या झाल्यास युद्धाची औपचारिक समाप्ती होईल आणि इराणचा अणुकार्यक्रम तसेच ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ खुली करण्यासारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ३० दिवसांचा अवधी मिळेल.