वॉशिंग्टन – करोनामुळे जी आर्थिक मंदी देशात निर्माण होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकन सरकारने बाहेरील देशाच्या युवकांना नोकरीसाठीचा एच-1बी व्हिसा देणे थांबवावे, अशी सूचना अमेरिकन तंत्रज्ञान कर्मचारी वर्गाशी संबंधित एका संस्थेने अमेरिकन सरकारला केली आहे. त्यामुळे भारतातील आयटी तंत्रज्ञांची मोठी अडचण होणार आहे. अमेरिकन माहिती तंत्रज्ञान कंपन्या दरवर्षी भारत आणि चीन मधून हजारो लोकांना नोकऱ्या उपलब्ध करीत असतात.
युस टेक वर्कर्स नावाची संस्था अमेरिकन स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या हितासंबंधी काम करते. त्यांनी सरकारला एच-1बी आणि एच-2बी व्हीसा थांबवण्याची सुचना केली आहे. एच-1बी व्हीसा तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी जारी केला जातो तर एच-2बी व्हीसा अमेरिकेत शेतीविषयक काम करणाऱ्या पाहुण्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांना जारी केला जातो. हा व्हिसा साधारणपणे लॅटीन अमेरिकीतील कामगारंना दिला जातो.
सध्याच्या स्थितीमुळे पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत अमेरिकेत 5 ते 7 कोटी लोक बेराजगार होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या गुरुवार पर्यंतच अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी लेऑफ जाहीर केल्यामुळे तीस लाख लोक बेरोजगार झाले आहेत. नवीन एच-1बी व्हीसा संख्येनुसार यावर्षी अमेरिकेत 85 हजार नवीन तंत्रज्ञ विदेशातून अमेरिकेत नोकरीसाठी येणार होते. या प्रक्रियेत आत्तापर्यंत 35 हजार लोकांना नव्याने एच-1बी व्हीसा देण्यात आले आहेत.
हे व्हिसाहीं रद्द करा अशी सूचना या संस्थेने अमेरिकेच्या प्रशासनाला केली आहे. सध्याची मंदीची स्थिती आणि भविष्यात उद्भवणारी आव्हाने लक्षात घेऊन अमेरिकन प्रशासनाने आता काही काळापुरती नवीन कर्मचाऱ्यांसाठी व्हिसा देणे बंद करावे, अशी आग्रही भूमिका या संस्थेने घेतली आहे. अमेरिकेत येत्या काही काळात चार कोटी 70 लाख लोक बेकार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अमेरिकेत आधीच ग्रीन कार्डाच्या संबंधातील नियमावली कडक केल्याने तेथे काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना ग्रीन कार्ड मिळण्यासाठी तब्बल तीस वर्ष प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वृत्त अलीकडेच प्रसारित झाले होते. आता व्हिसाच बंद केला तर भारतातील आयटी तज्ज्ञांना अमेरिकेत नोकरीसाठी जाण्याचे स्वप्नच काही काळासाठी विसरून जावे लागेल, अशी स्थिती आहे.