Nijjar murder Case : कॅनडा सरकारनेच आता ‘ते’ बदनामीकारक वृत्त फेटाळले, मोदींचे नाव आल्यामुळे आले होते गोत्यात…

ओटावा – कॅनडाच्या माध्यमांमध्ये भारताची बदनामी करणाऱ्या बातम्या आल्यानंतर भारताने तिव्र शब्दात कॅनडाला फटकारले होते. त्यानंतर आता कॅनडाचे जस्टिन ट्रूडो सरकार शुध्दीत आले आहे. कॅनडातील गुन्हेगारी कृत्य प्रकरणात (निज्जर हत्या प्रकरण) पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची नावे असलेल्या वृत्ताला कॅनडाच्या सरकारने फेटाळले आहे. मात्र, भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत कॅनडाने मौन बाळगले आहे.
कॅनडाच्या प्रिव्ही कौन्सिल कार्यालयाने याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव आणि सातत्याने असलेला धोका ध्यानात घेत १४ ऑक्टोबर रोजी आमच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या एजंटांचा कॅनडातील हालचालींमध्ये सहभाग असल्याच्या संदर्भात आरोप करण्याचे असाधारण पाउल उचलले होते.
मात्र कॅनडा सरकारने पंतप्रधान मोदी, जयशंकर अथवा अजित डोवाल यांचे कॅनडातील हिंसाचाराशी तार जोडणारे कोणतेही पुरावे दर्शवलेले नाही व त्याची त्यांना कल्पनाही नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागाराने स्वाक्षरी केलेले हे निवेदन आहे.
G20 Summit 2024 : आगामी काळात भारत-इटलीची दृढ भागिदारी – पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी
तत्पूर्वी, भारताने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाच्या प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांना बदनामी मोहीम म्हणून संबोधले होते. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की अशा मोहिमेमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले जातील आणि असे हास्यास्पद आरोप पूर्णपणे फेटाळले पाहिजेत.





