Rakul Preet Singh : शूर्पणखेच्या लूकवरून ट्रोलिंग, अखेर रकुल प्रीत सिंहने मौन सोडलं; सडेतोड उत्तर देत म्हणाली…
Rakul Preet Singh : त्यातच अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या शूर्पणखेच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Rakul Preet Singh : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा भव्य चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कलाकारांच्या लूकवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यातच अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या शूर्पणखेच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
‘रामायण’मध्ये रकुल प्रीत सिंह शूर्पणखेची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील तिच्या लूकवर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली होती. या टीकेनंतर आता अभिनेत्रीने मौन सोडले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रकुलने शूर्पणखेच्या व्यक्तिरेखेबद्दल आपले मत मांडले.
रकुल म्हणाली, “मला वाटतं की या चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी रोमांचक आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट जगासमोर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. आपला इतिहास आणि आपली कथा जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. दुसरीकडे, शूर्पणखा हे असं पात्र आहे, ज्याच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. या व्यक्तिरेखेला अनेक वेगवेगळे पैलू आहेत. खरं तर, तिच्यामुळेच युद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या छटा असलेली भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप रंजक अनुभव होता.”
दरम्यान, ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सनी देओल हनुमानाची आणि रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहेत.
हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून चित्रपटाची निर्मिती भव्य स्तरावर करण्यात आली आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी, तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





