पश्चिम बंगालमध्ये सर्व 4 मनपांमध्ये तृणमूलचा विजय

कोलकाता – पश्चिम बंगामध्ये झालेल्या चार महापालिकांच्या निवडणूकीत तृणमूल कॉंग्रेसने सर्व ठिकाणी विजय मिळवला आहे. सिलीगुडी, चंदनागोर, बिधानगर आणि असनसोल या चारही महापालिकांमध्ये करोनाच्या साछीमुळे उशीराने निवडणुका झाल्या होत्या, या चारही महापालिकांमध्ये तृणमूल कॉंग्रेसची सरशी झाल्याचे चित्र मतमोजणीच्या उत्तरार्धात स्पष्ट झाले होते. असनसोलमधील 106 पैकी 54, बिधानगरमधील 41 पैकी 39, चंदनगोरमध्ये 92 पैकी 19 आणि सिलीगुडीमधील 47 पैकी 38 जागांवर तृणमूल कॉंग्रेसने विजय मिळवला आहे.
हा निकाल म्हणजे “मां, माटी आणि मानुष’ या धोरणाचा निर्विवाद विजय असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. तृणमूल कॉंग्रेसवर आपला विश्वास कायम दाखवल्याबद्दल त्यांनी या चारही महापालिकांच्या मतदारांचे मनापासून आभार मानले आहेत.
तृणमूलचे मंत्री गौतम देब हे सिलीगुडीचे महापौर होतील, असे ममता बॅनर्जींनी जाहीर केले आहे. अन्य महापालिकांमध्ये महापौर कोणाला करायचे याबाबत चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.





