Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा; भारतीय पुरातत्व खात्याचं पोलिसांना पत्र

नाशिक : गुढी पाडव्यापासून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्त मंडळाकडून भाविकांना बुंदीच्या लाडूच्या प्रसादाचे वाटप सुरु करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याकडून त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
तिरुपती बालाजी, पंढरपूर, शिर्डी संस्थानप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील गुढी पाडव्यापासून भाविकांना प्रसादाचे बुंदीचे लाडू मिळत आहेत. मंदिराच्या आवारात परवानगी न घेता विश्वस्त मंडळाकडून प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याप्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या लाडू विक्री विरोधात माजी विश्वस्तांनी देखील भारतीय पुरातत्व खात्याकडे तक्रार दाखल केली होती.
मंदिराच्या आवारात प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्या प्रकरणी पुरातत्त्व खात्याकडून पोलिसांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे संरक्षित स्मारक असतानाही, तेथे अनधिकृतपणे व्यावसायिक लाडू विक्री सुरू केल्याचा गंभीर आरोप विश्वस्त मंडळावर करण्यात आला आहे. तर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा, असे भारतीय पुरातत्व खात्याने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आता या प्रकरणावर त्र्यंबकेश्वर पोलीस नेमकी काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





