– डॉ. कुमार सप्तर्षी झोपडी संघ, धरणग्रस्त, एक गाव एक पाणवठा, देवदासी प्रथेचे निमूर्लन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा चळवळींनी समाजातील लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम बाबा आढावांनी केले. कष्टकरी लोकांचा हा आवाज अनंतात विलिन झाला आहे. भारतात श्रमिकांच्या चळवळीला दीर्घ परंपरा आहे. कामगार संघटना या क्रांतीच्या माध्यम आहेत, असे कम्युनिस्ट व समाजवादी मानत. ज्याच्याकडे कामगार संघटना नाही, तो क्रांतिकारक असूच शकत नाही, असे समीकरण होते. दुर्दैवाने, संघटित कामगारांमार्फत देशात लोकशाहीची किंवा समाजवादी क्रांती आली नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबा आढाव यांचे कार्य महत्त्वाचे असल्याचे जाणवते. त्यांनी उद्योग जगतात कामगार संघटना बांधण्याचा विचारही मनात घेतला नाही. एके काळी कामगार संघटनाच आपल्या वर्गणीतून डावे पक्ष चालवत. अधिक अवघड क्षेत्राला बाबांनी हात घातला. असंघटित कामगारांची दु:खे दूर करणे हे त्यांनी लक्ष्य ठरविले. त्यांनी वयाच्या विशीतच ‘झोपडी संघा’ची स्थापना केली. वयाच्या तेविसाव्या वर्षी ‘महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी’ यांची संघटना बांधायला इतरांबरोबर सुरूवात केली. या चळवळीतून ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ ही घोषणा निर्माण झाली. वयाच्या पंचविशीत त्यांनी ‘हमाल पंचायत, पुणे’ या श्रमिक संघटनेची स्थापना केली. 1971 मध्ये ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’ची स्थापना केली. त्या संस्थेमार्फत त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारधारेला महाराष्ट्रात नव्याने व ठळक रूपाने पुढे आणले. 1972 मध्ये बाबा आढावांनी महाराष्ट्रात ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली. अस्पृश्यता कायद्याने संपली होती; पण ती गावगाड्यात शिल्लक होती, असा तो काळ. अस्पृश्यांच्या विहिरी वेगळ्या असत. जेथे अन्य गावकरी पाणी भरत, त्या पाणवठ्याला शिवण्याची अस्पृश्य वर्गाला गावाची परवानगी नव्हती. ‘एक गाव, एक पाणवठा’ या चळवळीने समाजमनातील किल्मिष दूर केले. 1974 मध्ये ‘देवदासी प्रथेचे निर्मूलन आणि त्यांचे पुनर्वसन’ या चळवळीशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे ते मार्गदर्शक होते. पुढे त्यांनी रिक्षा चालकांना संघटित केले. त्यांच्या संघटनेत सामील झालेल्या रिक्षा चालकांची संख्या लाखोंच्या घरात होती. कचर्यातून काच, पत्रा वगैरे वस्तू गोळा करणार्या असंघटित कामगारांची त्यांनी संघटना बांधली. या सगळ्यांचा एकच अर्थ होता, संघटित कामगार क्षेत्रात संघटनेचे संरक्षण मिळायचे. बाबांचे लक्ष मात्र ज्या कष्टकर्यांना कोणी वाली नाही तिकडे जायचे. त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारसरणीचा आधार घेतला. कोणत्याही सभेत वा बैठकीत बाबा भाषणापूर्वी महात्मा फुले यांच्या ‘अखंडां’चे गायन करीत. महात्मा फुले यांची नजर त्यांनी घेतली होती. त्या नजरेतून ते कोणत्याही प्रश्नाकडे पाहत. महात्मा फुले यांचे भव्य स्मारक करावे, हे त्यांचे स्वप्न होते. ते जवळपास पूर्ण होत आले आहे. फुले वाडा हे जणू त्यांचे घर होते. कष्टकर्यांच्या वेदना बाबांच्या बोलण्यात ठायी ठायी दिसत असल्या तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग मिश्किल होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोजमाप करायचे असेल तर एक गोष्ट अधोरेखित होते, ती म्हणजे ज्या क्षेत्रात आधीपासून कोणी नेता नाही, वाली नाही, तिथे बाबा प्रवेश करणार. त्या श्रमिकांना बाबा अचानक आकाशातून उतरलेला देवदूतच वाटत. त्यामुळे बाबांचा लोकसंग्रह दांडगा होता. त्या लोकसंग्रहातून त्यांना एका क्षेत्राकडून दुसर्या क्षेत्राकडे जाण्याची प्रेरणा व बळ मिळे. नाना पेठेत दवाखाना सुरू केल्यानंतर हमाली काम करणारे रूग्ण त्यांची दु:खे बाबांना सांगत. म्हणून बाबा हमालांना संघटित करण्याच्या क्षेत्राकडे वळले. हमाल पंचायत पुढे खूप वाढली, संख्येने आणि प्रभावाने! डॉक्टरकीच्या खासगी प्रॅक्टिसमधून डॉ. दादा गुजर यांच्या नेतृत्वाखाली बाबांनी हडपसरला सहकारी तत्त्वावरचा दवाखाना काढला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाल्यावर डॉक्टरकीत त्यांची घुसमट होऊ लागली. म्हणून मेडिकल प्रॅक्टिस सोडून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रवेश केला. त्यामागे प्रेरणा लोकसंग्रहाची होती. पुढे पुण्यात निवडणुकीच्या राजकारणासाठी ‘नागरी संघटना’ स्थापन झाली. त्यामार्फत बाबा दोन वेळा नगरसेवक झाले; पण महापौरपदाची निवडणूक मात्र ते हरले. नंतर पुणे जिल्ह्यातील खेड मतदारसंघात लोकसभेसाठी ते उभे राहिले. तिथेही पराभव झाला. त्यानंतर मात्र ते निवडणुकीच्या राजकारणाच्या कट्टर विरोधात गेले. निवडणुकीतून राजकारणात परिवर्तन साध्य होणार नाही, असा ठाम सिद्धांत ते मांडू लागले. बाबांनी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ म्हणून एका ट्रस्टची स्थापना केली. जे केवळ समाजकारणात काम करीत आहेत, निवडणूक लढवित नाहीत, अशा कार्यकर्त्यांना या संस्थेतर्फे मानधन मिळू लागले. 1934 मध्ये ‘काँग्रेस समाजवादी पक्षा’ची स्थापना झाली. समाजवादी विचारांच्या तरूणांचा तो पक्ष होता. काँग्रेसला प्रतिगामी होऊ द्यायचे नाही आणि तिला डाव्या दिशेला वळवायचे असा त्यांचा संकल्प होता. तेव्हापासून समाजवादी नेते जोरदार भाषणे करू लागले. काँग्रेसच्या पुढार्यांइतक्याच आपल्या सभा जोरदार होतात, हे पाहून त्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला. काँग्रेस पक्षातल्या ज्येष्ठ पुढार्यांवर ‘अमका प्रतिगामी आहे’ असे शिक्के ते मारू लागले. त्यामुळे त्यांची 1946 मध्ये काँग्रेसमधून हकालपट्टी झाली. त्यानंतर समाजवादी चळवळ स्वतंत्रपणे वाटचाल करू लागली. या चळवळीला फुटिरतेचा शाप होता. मतभेद झाले, की लगेच एका पक्षाचे दोन समाजवादी पक्ष होणार, हे ठरलेले. दोघेही वाढायचे नाहीत. एकटेपणाची जाणीव झाली, की पुन्हा एकत्र यायचे असा प्रकार चालू झाला. त्यामुळे समाजवादी चळवळीची लोकांमधील पत कमी झाली. जनता पक्षात सामील झालेले लोक पक्ष फुटल्यानंतर आपापल्या जुन्या पक्षात परत गेले. बेवारशी झाले ते फक्त समाजवादी गट. महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचा इतिहास पाहता एस. एम. जोशी व नानासाहेब गोरे हे मूळचे काँग्रेस समाजवादी पक्षाचे. त्यांनी समाजवादी चळवळीची धुरा बापू काळदाते, पन्नालाल सुराणा, भाई वैद्य, बाबा आढाव या पिढीकडे सोपविली. पण त्यांच्याकडून धाकट्याकडे वारसा जाणे शक्य नाही. कारण त्यांच्यासोबत त्यांच्यापेक्षा धाकटे कोणी राहिले नाहीत. याचा अर्थ, 1934 सालची समाजवादी मांडणी आज पूर्णपणे संपुष्टात आली. शेवटचे बुरूज पन्नालाल सुराणा व बाबा आढाव होते. ते ढासळल्यानंतर आता धाकट्या समाजवादी विचाराच्या लोकांना पुढील वाटचालीसाठी व्यापक चिंतन करून पुढचा मार्ग शोधावा लागेल. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाचा इतका व्यापक अर्थ आहे. माझी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली! एका युगाचा अस्त झाला. (लेखक युक्रांदचे संस्थापक तसेच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आहेत.)