श्रद्धांजली: ग्रेट अॅनिमेटर राम मोहन

राजेश खेले,                                                                                                                  11 ऑक्‍टोबर 2019 रोजी भारतीय ऍनिमेशनपटांचे अनभिषिक्‍त सम्राट राम मोहन यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ते आपल्यामागे अनेक पुढच्या पिढीचे ऍनिमेशनकार घडवून गेले. सशक्‍त स्वतंत्र कथाकथन शैली, जोरकस रेखाटन क्षमता, पात्र रचनाकार, वेशभूषाकार, सिनेमॅटोग्राफर, अभिनय, दिग्दर्शन, साहित्यभिरूची असलेला, व्यावसायिक ऍनिमेशनपट निर्माता अशा अनेक शक्‍तिस्थळांचा वस्तुपाठ म्हणजे राममोहन. त्यांच्या शिष्याने सांगितलेल्या काही आठवणी…

वर्ष 1991 मध्ये माझी पहिली नोकरी आणि ऍनिमेशन क्षेत्रातील श्रीगणेशा राम मोहन सरांकडेच झाला. मला देऊ केलेल्या अमूल मिल्क, बाटा बबल गमर्स, हॅन्डीप्लास्ट, कॅडबरी जेम्स, हाजमोला, रसना अशा 75 पेक्षा जास्त जाहिराती, 15 लघुपट, दोन पूर्ण लांबीचे चित्रपट असा आठ वर्षांचा भरपूर अनुभव त्यांच्याकडे मिळाला. “युनेस्को’ आणि “युनिसेफ’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर काम करण्याची संधीही मिळाली.

राम मोहन यांनी आम्हाला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारंभात चित्रपट कसे पाहायचे, याचे धडेही दिले. “ऍनिमेशन म्हणजे फक्‍त कार्टून नव्हे,’ हा दृष्टिकोन त्यांनीच दिला. ऍनिमेशनपटांकडे पाहण्याची व्यापकताही त्यांच्यामुळेच मिळाली. प्रत्येकास आपापल्या शैलीत ऍनिमेशनपट बनवता येतो, हा आत्मविश्‍वासही मिळाला. “राम मोहन बायोग्रफिक्‍स’ म्हणजे पाश्‍चिमात्य प्रभाव असलेला जाहिरात क्षेत्रात ऍनिमेशनपटांचा दबदबा असलेला स्टुडिओ. जाहिरात क्षेत्रातील दिग्गजांशी डिस्कशन्स, ठरलेली चित्रशैली, ऍनिमेशनपटांची निर्मिती प्रक्रिया, टीमवर्क, 35 एमएम फिल्मवरील शुटींग, स्टुडिओचे वातावरण, रावको लॅबमधील फिल्म प्रोसेसिंग, फिल्म टेस्टिंग, दिवस-रात्र काम असे कितीतरी अत्यंत आनंद देणारे क्षण मिळाले आणि आज अनुभवसिद्ध होता आले राम मोहन यांच्यामुळेच. त्यांच्यासमवेत शिवाजी साटम व बापू परुळेकर यांचा सहवास प्रोत्साहन देणारा ठरत असे.

जसलोक रुग्णालयात सेवा देणारी डॉ. शीला राव ही पत्नी आणि कार्तिक नावाचा मुलगा असे हे त्रिकोणी कुटुंब. विशेष म्हणजे वर्ष 1995 मध्येही 4000 रुपयांत मुंबईत घर चालविणारे राम मोहन यांचे आम्हाला आश्‍चर्य वाटत असे. परंतु पुस्तके आणि भरपूर व्हिडीओज त्यांच्या संग्रही होते. अफाट बुद्धी आणि गुणवत्ता राम मोहन यांच्यामध्ये शिगोशिग भरली होती. शास्त्रीय संगीताची आवड ही त्यांची अजून एक मला आवडणारी गोष्ट. बहुधा त्यामुळेच ते 60 वर्षांहून अधिक काळ ते ऍनिमेशनपटांसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात कारकीर्द घडवू शकले. सदैव रेखाटने करीत राहणे हा त्यांचा श्‍वासच होता. त्यांच्या स्टुडिओत सत्यजित राय, अशोक कौल, युगो साको, शाम बेनेगल, प्रल्हाद कक्‍कर, गोविंद निहलानी अशा दिग्गजांची ये-जा असायची. राम मोहन स्वभावाने अत्यंत नम्र, शांत, आपल्याच विश्‍वात रमणारे आणि मितभाषी होते.

वर्ष 2014 मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान “पद्मश्री’ हा राम मोहन यांना जाहीर झाला. हा सन्मान त्यांना मिळाल्याने सर खुश होते. त्याच वर्षी त्यांचा पुण्यात गौरव समारंभ आम्ही आयोजित केला होता. सर सपत्नीक हजर होते. मोठ्या आनंदाने त्यांनी माझ्यासारख्या अत्यंत लहान शिष्याकडून हा गौरव स्वीकारला. एक दिवस पुण्यात मुक्‍काम केला. अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा पाहुणचार घेतला, आस्थेने चौकशी केली. माझ्या स्टुडिओत येऊन गेले. माझे काम पाहून समाधान व्यक्‍त केले. माझ्या एका ऍनिमेशनपटांच्या सीडीचे प्रकाशन त्यांच्या हातून झाले. तो क्षण माझ्याकरिता सर्वोच्च धान्य झाल्याचा होता. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “पिफ-2016′ मध्ये त्यांच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीवर मला फिल्म करायचा सन्मानही मिळाला. त्यानंतर निरंतर सर भेटत होते. “मला स्टोरीबोर्डचे काम दे; मी मुंबईतून तुला मदत करतो,’ असे म्हणाले. वयाच्या 82 व्या वर्षी सर नवीन लोकांबरोबर काम करू इच्छित होते हे विशेष. तंत्रज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता. आतापर्यंत टॅबवर अनेक तास ते काम करीत.

पुण्यात आल्यावर एकदा पंडित विद्यासागर यांच्या “ओवीबद्ध शास्त्र’ या विषयावरील पुस्तकावर ऍनिमेशन करायचे बोलणेही झाले होते. ते राहूनच गेलं आता. लहान मुलांना भौतिकशास्त्रातील गमती-जमती ऍनिमेशनमधून समजावून सांगाव्यात, असे ते म्हणत. नवनवीन विषय ऍनिमेशनमधून मांडायचा त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या विचारातील ऍनिमेशन प्रत्यक्षात प्रेक्षकांना दाखवणे, त्याचा आविष्कार सादर करणे ही आता आमची दुसऱ्या फळीतील त्यांच्या शिष्यांची जबाबदारी आहे. ती सक्षमपणे पार पाडणे हीच त्यांना आणि त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.