– नामदार सुनील तटकरे महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील रोखठोक-कार्यतत्पर लोकनेता म्हणून लाखो नागरिकांचे अत्यंत जवळचे असणारे अजितदादा पवार यांचे अपघाती निधन अत्यंत क्लेशदायी आहे. राजकारणातील अनेक चढउतार आम्ही एकत्रितपणे पाहिले आहेत आणि दादांच्या खंद्या पाठिंब्यामुळे आलेल्या प्रत्येक आव्हानाचा निडरपणाने मुकाबला करत आलो आहोत. त्यांच्या जाण्यानं पोरकेपणाची भावना मनात निर्माण झाली आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त असताना अचानकपणाने वाहिन्यांच्या पडद्यावर अजितदादांच्या अपघाताचे वृत्त प्रसारित झाले आणि काही मिनिटांतच दादांचे दुर्दैवी निधन झाल्याचे झळकू लागले तेव्हा हे वृत्त खोटे असावे, असे वाटले होते. ते पाहताक्षणी मन कमालीचे अस्वस्थ झाले. डोळ्यातील अश्रूंना रोखता येणे कठीण झाले. अजितदादा गेले, ही कल्पनाच मनाला करवेना! स्वतः राजकारणात यशस्वी झालेल्या अजितदादांनी आजवर अनेकांना उभं केलं असून मीही त्यापैकीच एक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवारसाहेब आणि अजितदादा पवार यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावरच मी राजकारणात उभा राहिलो आणि आहे. मोठ्या साहेबांचा राजकीय वारसा अजितदादा पवार यांनी तरुण वयातच स्वीकारला आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी अनेक जबाबदार्या स्वीकारून त्या यशस्वीही केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर सर्वांत मोठ्या गटाने अजितदादा पवार यांचे नेतृत्व स्वीकारत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजितदादांना पक्षातील बहुतांश प्रमुख नेते आणि लोकप्रतिनिधींसह राज्यभरातील पदाधिकार्यांनी पाठिंबा दिला. त्या सर्व काळात अजितदादांसोबत आम्ही होतो. त्यावेळची दादांची मनःस्थिती अवर्णनीय होती; पण राज्याच्या विकासासाठी ते पुढे जात राहिले. Ajit Pawar पक्षाची संपूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकांत सर्वाधिक स्ट्राइक रेट राखत 41 आमदार दादांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले. आजपर्यंतच्या त्यांच्या अविरत राजकीय कामाचे हे फलित होते. अजितदादांचे संघटन कौशल्य पक्षाला तर बळकटी करणारे होतेच; पण त्याचबरोबर राज्याच्या प्रगतीला गतिमान करण्यास मदत करणारे होते. प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि कार्यक्षम निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अतुलनीय होती. अजितदादांनी मागील चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राज्य सरकारमध्ये विविध विभागांच्या मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. विशेषतः अर्थ आणि जलसंपदा खात्यात अनेक महत्त्वाचे आणि जलद निर्णय घेतले. दादांविषयी काय काय आणि किती बोलावे! त्यांच्या कार्याचा महासागर शब्दांमध्ये मावणारा नाही. दादांच्या संघटन कौशल्याचा मी मागील अनेक वर्षांचा एक साक्षीदार आहे. अनेक अवघड निर्णय घेतल्यानंतर ते सत्यात उतरवताना संघटनेवरील पकड मजबूत ठेवण्यात ते मातब्बर होते. त्यांच्या या गुणामुळे राष्ट्रवादी पक्ष पुन्हा भरारी घेताना दिसला. अलीकडील काळात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येत असल्याने दादा सुखावले होते; पण काळाने अशा क्षणीच त्यांच्यावर घाव घातला. दूरदृष्टीपणा, स्पष्टवक्तेपणा, रोखठोक, मिश्कील, वक्तशीरपणा, शिस्त अशा अनेक गुणांचा समुच्चय म्हणजे दादा. यात महत्त्वाचे म्हणजे प्रशासकीय कामकाजाची माहिती आणि प्रशासनावर दादांची पकड होती. दादा आजवर अनेक महत्त्वाच्या खात्यांचे (उदा. अर्थ, जलसंपदा, ऊर्जा, सहकार) मंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या कामाची पद्धत थेट आणि स्पष्ट होती. वेळेवर निर्णय घेणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये होती. यामुळे त्यांना प्रशासकीय स्तरावर एक कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जात होते. अजित पवार यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दांडगा जनसंपर्क आणि प्रचंड शिस्तप्रियता. ते लोकांमध्ये मिसळत, त्यांच्या समस्या ऐकून घेत आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत. यामुळे लोकांना हा घरचा, आपल्या हक्काचा दादा वाटायचा. बारामती लोकसभा मतदारसंघातून आणि नंतर बारामती विधानसभा मतदारसंघातून अनेकवेळा निवडून येणे, हे त्यांच्या स्थानिक पातळीवरील मजबूत पकडीचे द्योतक होते. सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ आणि बँकांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली. ही सर्व पदे नागरिकांशी थेट संबंध निर्माण करून देणारी आहेत, किंबहुना ही पदे भूषवताना संबंधित सभासदांशी थेट संपर्क ठेवावा लागतो. यामुळे त्यांचा ग्रामीण आणि सहकारी क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी आणि लोकांशी जवळचा संबंध राहिला. यातूनच त्यांना कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे करता आले आहे. राजकीय यश आणि परखडपणा या तशा एकमेकांशी विसंगत वाटणार्या बाबी. पण अजितदादा हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जात. ते आपले विचार थेटपणे मांडत आणि निर्णय घेण्यास कचरत नसत. काम होणार असेल तर हो, नाहीतर नाही, अशी त्यांची भूमिका असायची, यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला जात असे. हा थेटपणा त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही आकर्षित करायचा. वक्तशीरपणा आणि कामाचा वेग याबाबत दादांनी घालून दिलेला आदर्श पुढील अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखा राहील. भविष्याचा वेध घेऊन विकासकामे करणे, हे त्यांच्या कार्यशैलीचे एक महत्त्वाचे अंग होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांनी उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. कौशल्य विकास केंद्रांच्या उभारणीतही ते सक्रिय राहिले. या सर्व गुणांमुळे अजित पवार यांचे संघटन कौशल्य प्रभावी ठरले. सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि विकासकामांना प्राधान्य देणे हे त्यांची कार्यपद्धती होती. ते केवळ घोषणा करण्याऐवजी प्रत्यक्ष कामे पूर्ण करण्यावर भर देत. उपमुख्यमंत्री म्हणून ते राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करून वास्तववादी निर्णय घेत असत. यामुळे राज्य आर्थिक वृद्धीच्या दिशेने अग्रेसर राहिले. यादरम्यान दादा नेहमीच राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल स्पष्टपणे बोलताना दिसून आले. उपमुख्यमंत्रिपदावर असतानाही त्यांचा स्पष्टवक्तेपणा कायम राहिला. सरकारच्या धोरणांबद्दल किंवा विरोधकांच्या टीकेला ते थेट उत्तरे देत. उगाचच बाष्कळ बडबड करणे किंवा मतांच्या आकर्षणासाठी लांगुलचालन करणे दादांना कधीच जमले नाही. जे आहे ते स्पष्टपणाने मांडणे हा दादांचा स्वभावपिंड होता. असा लोकनेता पुन्हा होणे दुर्मिळ आहे. दादांचा वियोग ही आयुष्यातील सर्वांत मोठी हानी आहे. कधीही न भरून येणारी. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.