जसा भाव तसा देव, असं म्हटलं जातं. कुणाचा देव निर्गुण, निराकार तर कुणाचा सगुण, साकार. माणूस आपल्या दृष्टीतून देव पाहतो आणि त्याची भक्ती करतो. त्याला मागणं मागतो, गार्हाणं घालतो, उपासतापास करतो, नवस बोलतो, कधी कधी देवावर रुसतोही. विविध मानवी समूहांनी आपापल्या दृष्टिकोनातून परमात्म्याला पाहिलं, जाणायचा प्रयत्न केला आणि त्याच्या आराधनेच्या विविध पद्धती रूढ केल्या. म्हणूनच आपल्या देशात वैविध्यपूर्ण रूढी-परंपरा दिसून येतात. भाद्रपद महिन्यात आपण मराठीजन गौरी-गणपतीच्या उत्सवात रंगून गेलो आहोत. विघ्नहर्ता आणि सुखकर्ता या रूपात भगवंताला पाहतो आहोत. त्याच वेळी छत्तीसगडमधला एक समुदाय अशा यात्रेची तयारी करतोय, जिथं देवांना भक्तांची विघ्नं दूर करणं सक्तीच आहे. बोललेला नवस पूर्ण करणारे अनेकजण आपण पाहतो. पण देवाकडे मागितलेल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, म्हणून त्याला आरोपीच्या पिंजर्यात उभं करणारा हा समुदाय आहे. हाकेला न धावणार्या देवांवर खटला चालतो आणि त्यांना शिक्षाही दिली जाते. छत्तीसगडमधील बस्तर ही देशातल्या सर्वांत जुन्या वसाहतींपैकी एक मानली जाते. रामायणातलं दंडकारण्य आणि महाभारतातलं कौशल साम्राज्य म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. आदिवासींची लोकसंख्या सत्तर टक्के असणारा हा भाग जंगलव्याप्त असून, माओवाद्यांच्या कारवायांमुळे सतत चर्चेत असतो. माओवादी तिथं ‘त्यांची’ न्यायालयं चालवतात आणि शिक्षाही देतात. पण त्याहीपेक्षा वरचढ मानलं जाणारं एक न्यायालय आहे. नौ परगना नावानं परिचित असलेल्या या भागात 55 गावं समाविष्ट आहेत आणि भंगाराम देवी ही तेथील आदिवासी समुदायांची प्रमुख देवी आहे. नैसर्गिक आपत्ती, आजारपण, पिकं खराब होणं अशा परिस्थितीत लोक आपापल्या ग्रामदेवतेला शरण जातात. या देवता संकटांपासून आदिवासींचं रक्षण करतात. त्यांचं भलं करतात. परंतु एखाद्या देवतेनं भक्तांचं म्हणणं ऐकलं नाही, तर त्या देवतेला न्यायालयात उभं राहावं लागतं. त्यांची ‘ट्रायल’ होते आणि शिक्षाही दिली जाते… हो, खुद्द देवाला! तसं पाहायला गेलं, तर जो कोणी संकटकाळी मदत करेल, त्या प्रत्येकाला देव मानण्याची आदिवासींची परंपरा आहे. परंतु मदत करण्याची सक्ती मात्र खर्या देवांवरच आहे. भाद्रपद महिन्यात भादो जत्रेची लगबग सुरू होते. वेगवेगळ्या समुदायांमधील आदिवासी आपापल्या ग्रामदेवतेची पालखी भंगाराम देवीच्या दर्शनाला घेऊन येतात. जत्रा तीन दिवसांची. प्रत्येक गावच्या देवाला भंगाराम देवीसमोर उभं केलं जातं आणि प्रतीकात्मक खटला उभा राहतो. साक्षीदार म्हणून कोंबडीला हजर केलं जातं. एखादी देवता दोषी ठरल्यास तिला भंगाराम देवीच्या देवळात ठेवून त्या गावचे गावकरी माघारी जातात. या प्रथेतील सर्वांत महत्त्वाचा भाग असा, की एखाद्या आपत्तीच्या काळात देवतेची शक्तीही कमी पडत असेल, हे गृहीत धरलं जातं. अशा वेळी त्या देवतेला ‘शिक्षेतून सूट’ मिळते. शिक्षा माफही केली जाते. इतिहास संशोधकांच्या मते, देव आणि माणूस यांच्या सहअस्तित्वाची कहाणी सांगणारी ही प्रथा आहे. परमेश्वराने माणसाचं रक्षण करायचं, त्याच्या गरजांची पूर्तता करायची आणि माणसाने परमेश्वराचं पूजन करायचं. हे संतुलन राखण्याची जबाबदारी दोघांवर आहे आणि म्हणूनच खुद्द देवालाही चुकण्याची परवानगी नाही.