Trent Q4FY26 Results: टाटा समूहातील आघाडीची रिटेल कंपनी ‘ट्रेंट लिमिटेड’ने बुधवारी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून, कंपनीने गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात २६ टक्क्यांची दमदार वाढ झाली असून तो ४०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला ३१८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. केवळ नफाच नव्हे, तर कंपनीने आपल्या भागधारकांसाठी लाभांश (Dividend) आणि बोनस शेअरची दुहेरी भेट जाहीर करत मोठी खूशखबर दिली आहे. महसुलात १९ टक्क्यांची वाढ – ट्रेंटने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीत कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात १९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीचा महसूल ५,०२८ कोटी रुपयांवर पोहोचला असून, मागील वर्षी याच काळात तो ४,२१६ कोटी रुपये इतका होता. ‘झुडिओ’ आणि ‘वेस्टसाइड’ सारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या जोरावर कंपनीने ही कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. गुंतवणूकदारांना बोनस आणि लाभांशाची मेजवानी – कंपनीने आपल्या भागधारकांसाठी १:२ या प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारांकडे ट्रेंटचे २ शेअर्स आहेत, त्यांना १ बोनस शेअर मोफत मिळेल. यासोबतच १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर ६०० टक्के म्हणजेच ६ रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे. बोनस शेअर्समुळे एकूण शेअर्सची संख्या वाढणार असल्याने, त्यानुसार लाभांशाची रक्कम काही प्रमाणात समायोजित केली जाऊ शकते. या दोन्ही प्रस्तावांसाठी आगामी ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मंजुरीनंतर ही रक्कम ३ दिवसांच्या आत वितरित केली जाईल. आव्हानात्मक परिस्थितीतही चांगली कामगिरी – नोएल टाटा टाटा समूहाचे नोएल एन. टाटा यांनी या निकालांवर समाधान व्यक्त करताना सांगितले की, जागतिक आणि आर्थिक आव्हाने असूनही कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भक्कम कामगिरी केली आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार ट्रेंट आपले लाइफस्टाइल ब्रँड पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्यावर भर देत आहे. तसेच, कंपनीच्या ‘स्टार’ बिझनेसमध्ये स्वतःच्या ब्रँड्सचा वाटा ७३ टक्क्यांहून अधिक झाला आहे. आगामी काळात फूड आणि ग्रोसरी मार्केटमधील संधी हेरण्यासाठी स्टोअर्सचा विस्तार अधिक वेगाने केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.