हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनतर्फे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वृक्षारोपण

पुणे : हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी उडदावणे गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात विविध प्रकारच्या 1000 झाडांच्या लागवडीचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल उचलले गेले. वाढत्या शहरीकरणामुळे घटत्या वृक्षसंख्येमुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी असोसिएशन वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय कणसे, सचिव मानसिंह चव्हाण, नवनिर्वाचित अध्यक्ष सुजाता नाईक, हडपसर विभागप्रमुख सिद्धू चव्हाण, सेंट्रल कमिटी सदस्य श्रीकांत माने, प्रकाश गाडे, सतीश भिसे, विजयराज पोतदार, असिफ शेख, दिनेश जांगडे, रवी घाग, विनोद सलोखे, विजय चौधरी, कुलदीप पाटील, संतोष गायके, आकाश खेडेकर, प्रीतम काकडे, ऋषिकेश शेळके, धिरज यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. तसेच, भारती हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत चव्हाण, आयआरएस अधिकारी रितेश बाविस्कर आणि श्रीतेश पटेल यांनीही उपस्थिती लावली.
संस्थेने दरवर्षी 1000 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे, यंदा कळसुबाई परिसरात विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली. शहरीकरणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. वृक्षारोपणातून आपण पर्यावरण रक्षणाचा वसा पुढे नेत आहोत, असे धनंजय कणसे यांनी सांगितले. सुजाता नाईक यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.





