पुणे जिल्हा | जुन्नरमध्ये राजकीय धुलवडीचा ट्रीझर

नारायणगाव, {मंगेश रत्नाकर} – शिव जन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील राजकारण प्रसंगी निकोप वाटत असले तरी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकारण बदलू लागले आहे.
राज्य पातळीवर जरी आघाडी व युती निर्माण झाली असली तरी प्रत्यक्षात तालुका पातळीवर आघाडी व युतीतील उमेदवार एकमेकांना शह देण्याचे काम करीत आहे.
आघाडी व युतीतील इच्छुक उमेदवार एकी दाखविण्यासाठी एखाद्या कार्यक्रमात एकत्र येत असले तरी आमदारकीची खुर्ची आपल्यालाच मिळावी यासाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवताना दिसून येत आहे.
त्यामुळे उमेदवाराच्या पोटात एक अन् ओठावर दुसरे असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी मलाच मिळणार असे गृहीत धरून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या पद्धतीने भेटीसाठी घेण्याचे काम सुरू आहे.
विधानसभेच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर महायुती व महाविकास आघाडीने घटक पक्षातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम केल्यास निवडणुका जिंकणे सोपे जाईल. त्यासाठी युती व आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
पण इच्छुक उमेदवारांना आमदारकीचे डोहाळे लागलेले असल्याने सध्या तरी तसे होऊ दिले जाणार नाही. त्यामुळे महायुती व महाविकासआघाडीने विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार जाहीर करताच जुन्नर तालुक्यात अनेक घडामोडी घडताना दिसून येतील, हे मात्र नक्की!
उमेदवार पक्षादेश पाळणार का?
विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार असून महाविकास आघाडी व महायुतीतील इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. परंतु जुन्नर तालुक्यातील विधानसभेची निवडणूक एकास एक झाल्यास चुरशीची होणार यात शंका नाही.
परंतु महाविकासआघाडी व महायुतीतील इच्छुक सर्वच उमेदवारांनी दंड थोपटल्यास निवडणूक बहुरंगी व बहुढंगी होणार हे निश्चित आहे. अशावेळी तालुक्यातील आमदारकीची निवडणूक एकास एक होण्यासाठी इच्छुक उमेदवार पक्षादेश पाळणार का? हे बघावे लागेल.
पर्यटन की मनोरंजन
नारायणगाव येथे नुकतीच महायुती सरकारची जुन्नर तालुका पर्यटन आढावा बैठक पार पडली. जुन्नर तालुका पर्यटन तालुका व्हावा हा आघाडी व महायुतीतील प्रत्येक नेत्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
परंतु राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने जुन्नर तालुका पर्यटन आढावा बैठक राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने हायजॅक केल्याचा आरोप महायुतीतीलच घटक पक्षाने केल्याने बैठक स्थळी पर्यटना ऐवजी मनोरंजन झाल्याचे महाविकास आघाडीचे नेते बोलू लागले आहेत.





