Mumbai Toll : मुंबईत जाणं महागलं! टोलच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ; जाणून घ्या नवे दर…
Mumbai Toll : नव्या दरानुसार मिनी बस आणि एलसीव्ही वाहनांसाठी ९० रुपये, तर ट्रक आणि बससाठी १८० रुपये टोल आकारला जाणार आहे.

Toll rates increase in Mumbai : मुंबईत जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबईतील पाच महत्त्वाच्या टोलनाक्यांवर नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) तीन वर्षांनंतर टोलच्या दरात वाढ करण्यात आली असून, वाहनांच्या प्रकारानुसार आता १५ ते ३५ रुपयांपर्यंत अधिक टोल भरावा लागणार आहे.
नव्या दरानुसार मिनी बस आणि एलसीव्ही वाहनांसाठी ९० रुपये, तर ट्रक आणि बससाठी १८० रुपये टोल आकारला जाणार आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांना २५५ रुपये टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईकडे नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खर्चात वाढ होणार आहे.
दरम्यान, सरकारने ऑक्टोबर २०२४ पासून हलकी वाहने, बेस्ट बस, एसटी बस आणि शालेय वाहनांना टोलमधून सूट दिली आहे. मात्र मिनी बस, एलसीव्ही, ट्रक, बस आणि अवजड वाहनांना पथकर लागू राहणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ५५ उड्डाणपुलांच्या खर्चाची वसुली करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर येथे टोलनाके सुरू करण्यात आले आहेत.
या टोलनाक्यांवरून होणारी वसुली २०२७ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी २०२३ मध्ये टोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षांनी MSRDC कडून पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील सूचना बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, १ ऑक्टोबरपासून नव्या दरांनुसार वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे.





