प्रभात वृत्तसेवा पुणे – लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून, येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नवनवीन प्रकल्प उभे करण्यात येत आहेत. पुण्यातील मेट्रो सहा कोचच्या करून हे सर्व प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होतील, असे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयात झाली. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पुणे मेट्रो लाइन 3 चे काम लवकर पूर्ण करून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या प्रकल्पासाठी तात्काळ भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच हडपसर – लोणी काळभोर कॉरिडॉर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडॉर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते, तसेच मेट्रोचे नियोजन करा आणि मल्टिलेव्हल इंटेग्रेशन करून मोठ्या प्रमाणात पार्किंग सुविधा निर्माण करण्याचेही आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिले. या मुदतीत होणार प्रकल्प पूर्ण.. – पुण्यात मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. – पुणे चिंचवड महापालिका ते निगडी या 4.4 किमी लांबीच्या इलिव्हेटेड मेट्रोचे काम हाती घेण्यात आले असून, हा प्रकल्प जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. – स्वारगेट ते कात्रज ही अंडरग्राउंड मेट्रो मार्च 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. – वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी हा कॉरिडॉर जुलै 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे.