Pratap Sarnaik : पुणे-सोलापूर महामार्गावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रवास करत असताना त्यांना भिगवण जवळील एसटीच्या एका अधिकृत हॅाटेल थांब्यावर एसटीच्या अनेक बस थांबलेल्या निर्दशनास आल्या. त्यांनी संबंधित हॅाटेलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रवाशांना अस्वस्छ वातावरणात जेवण वाढले असल्याचे त्यांना दिसून आले. याबात त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कडक कारवाई करावी, असा आदेश एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला. तसेच मंत्री सरनाईक यांनी भिगवण एसटी स्थानकालाही भेट दिली. परिवहनमंत्री पंढरपूर दौऱ्यावर निघाले असताना त्यांनी एसटीच्या अधिकृत हॅाटेल थांब्याची अचानाक पाहणी केली. यावेळी त्यांच्याकडे महिला प्रवाशांनी अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदवली. तसेच या पाहणीत त्यांनी प्रवाशांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का, अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का, याची चौकशी केली. यावेळी अनेक बाबींमध्ये त्यांना त्रूटी आढळून आल्या. त्यामुळे संबंधित त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या त्रूटी दूर झाल्या नाहीत, तर परवाना रद्द करण्याचा आदेश त्यांनी दिला. भिगवण बसस्थानकाला भेट यावेळी महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदवली. त्याची दखल घेऊन सरनाईक यांनी संबंधित प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीचा आदेश हॉटेलमालकास दिले आहेत. मंत्री सरनाईक यांनी महामार्गावरील भिगवण बसस्थानकाला भेट दिली. तेथील असुविधांबाबत स्थानिक रहिवाशांनी त्यांच्याकडे तक्रार केली. याची तात्काळ दखल घेत त्यांनी महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना नव्या प्रशस्त भिगवण बसस्थानकाची निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या.