satara | झेडपीत ई-ऑफिस प्रणालीमुळे पारदर्शकता व गतीमानता

सातारा (प्रतिनिधी)- सातारा जिल्हा परिषदेचा राज्यातच नव्हे तर देशभरात नावलाैकिक असून हा लाैकिक वाढवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन जनहिताचे विविध उपक्रम राबवत असते. नागरिकांचे कामे गतीने व्हावीत त्यामध्ये पारदर्शकता असावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज सुरू केले आहे.
त्यामुळे सर्वच विभागांतील कामांचा वेळेत निपटारा होण्यास मदत होत आहे. ई- ऑफिस प्रणालीची सर्वच विभागात कार्यवाही सुरू झाली आहे. या प्रणालीमुळे फायलींचा मेळ लागणार असून एकही फाइल गायब होवू शकणार नाही.
सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध पायलट प्रोजेक्टसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात. माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात आता जिल्हा परिषदेने आपला कारभार पेपरलेस करण्यासाठी पावले उचलली आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या सूचनेनुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपासून कार्यालयातील सर्व कामकाज ई- ऑफिस प्रणालीद्वारे सुरू केले आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व विभाग एकमेकांशी जोडले गेले आहेत. ही प्रणाली कार्यान्वित झाली असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आपल्या मोबाईलवर देखील कामकाजाच्या फाईल्स, कागदपत्रे बघता येत असल्याने एकप्रकारे कामकाजात गतीमानता येणार आहे.
ई- ऑफिस प्रणालीतून शासकीय कामकाजात गतिमानता आणून सर्वसामान्य लोकांची कामे वेळेत करण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन ते चार वेळा ई-ऑफिस प्रणालीसंदर्भात प्रशासनामार्फत प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
प्रशासनाच्या आदेशानुसार ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज सुरू झाले आहे. ई- ऑफिस प्रणालीमुळे कामात पारदर्शकता राहणार आहे. शिवाय कामांचा निपटारा वेळेत होणार आहे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत. या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कुठेही तक्रारीला वाव राहणार नाही.फायली दाबून ठेवण्याचे प्रकारही होणार नाहीत. याचबरोबर फायली गायबही होणार नाहीत.
नेटवर्कचा अडसर दूर होण्याची गरज
जिल्हा परिषदेने कामकाजात गतीमानता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीद्वारे प्रत्यक्षात कामकाज सुरु केले आहे. या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणीही सुरु आहे. एखाद्या विभागास अडचण आल्यास आयटी विभागाचे कर्मचारी तात्काळ ती अडचण दूर करत आहेत. मात्र नेटवर्कची समस्या अनेक विभागांना भेडसावत आहे.
वारंवार इंटरनेटचे स्पीड कमी होणे, इंटरनेट बंद होणे अशा प्रकारांमुळे गतीशील कारभाराला ब्रेक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने ही समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्याव, अशी मागणी होत आहे.
ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामांचा निपटारा गतीने होणार आहे. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण निर्धारित वेळेत होणार आहे. झिरो पेन्डंशीसाठी ही प्रणाली फायदेशीर ठरणार आहे. पुढच्या टप्प्यात पंचायत समित्यांमध्येही ही प्रणाली सुरु करण्याचा प्रयत्न असून त्यानंतर कारभाराला आणखी गती मिळणार आहे. – निलेश घुले (उपमुख्य कार्यकारी अधिकारी)





