Transformer Theft Gang Arrested – शिरूर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या आणि वारंवार विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या कारवाईत सात आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहित्रांमधील तांबे चोरीच्या घटना वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. या आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सापळा रचून या टोळीला वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी शिरूर तालुक्यातील १६ ठिकाणच्या चोरीची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपींमध्ये नजीबउल्ला घम्मल सहा, अमितकुमार मुन्ना सारोज, रवी बिज्रलाल आगरवाल, सुभाषचंद्र बिज्रलाल आगरवाल, शिवपूजन रामकुमार अग्रारी (मूळ रा. उत्तर प्रदेश), लालूकुमार कामेश्वर चौधरी (रा. बिहार), कालामुद्दिन कमरुद्दीन ठाकूर (रा. कुदळवाडी, चिखली) अशी नावे आहेत. पोलिसांनी या कारवाईत गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार, ४१० किलो वजनाचे तांबे आणि चोरीसाठी लागणारे विविध साहित्य असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे प्रमुख महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, हवालदार शिवाजी चितारे, अमोल चव्हाण, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, रोहिदास पारखे, विकास पाटील, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव आणि मच्छिंद्र निचित यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल चव्हाण करत आहेत.