Transformer Fire – सांगवी मधील कृष्णा चौक येथील खाऊ गल्ली परिसरात असणारे मस्तानी हाऊसला लागून असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला मंगळवारी (दि. १४) रात्री सव्वा अकराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही वेळातच अग्निशामक दलाची रहाटणी आणि थेरगाव येथील वाहने घटनास्थळी दाखल झाली. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धाव घेतली. काही वेळातच या आगीवर नियंत्रण आणले. या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु पूर्ण ट्रान्सफार्मर व डीपी जळाले. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित्राने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेची माहिती मिळताच रहाटणी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्याच्या सहाय्याने आग शमविली. तसेच एक गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढला. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा तातडीने खंडित केला. रोहित्राला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महावितरणचा डीपी बॉक्स, रोहित्र व आर.एम.यू. बॉक्स परिसरात अतिक्रमणांमुळे अपघातांचा धोका वाढत आहे. संबंधित विभागाने अतिक्रमणधारकांवर तातडीने कारवाई करावी, तसेच नागरिकांनीही या विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन महावितरणचे सहायक अभियंता संतोष पंचरस यांनी केले आहे.