बीड : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, तसेच या प्रकरणात सहभाग सिद्ध झालेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे. योगेश कदम यांनी आज मस्साजोग येथे भेट दिली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख तसेच मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी चर्चा केली. सरकार या प्रकरणी खंबीरपणे देशमुख कुटूंबियांच्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. देशमुख कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर योगेश कदम यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेतली. बीड तरुंगात कैदेत असणारा या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अतिविशिष्ट दर्जा (VVIP) प्रमाणे वागणूक तुरूंगातील अधिकारी देत आहेत असा आरोप सातत्याने होत आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असून कराड आणि त्याच्या सहकारी अरोपींना इतर कारागृहात हलविण्याबाबत कार्यवाही संदर्भात बोलेन असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मी आलो आहे. या अतिशय निर्घुण हत्याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही व आरोपीला फाशीच होईल या पद्धतीने आपण या प्रकरणाकडे पाहत आहोत, असेही योगेश कदम यावेळी म्हणाले. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निघृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करून त्यावर सुनावणीही सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर मंत्री कदम प्रथमच मस्साजोगला आले. गावकऱ्यांसह देशमुख यांच्या कन्या वैभवी व तिचे चुलते धनंजय देशमुख यांनी त्यांना या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. विशेषतः या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप असल्याची बाबही त्यांनी गृह राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांना मोठा पुरावा मिळाला मनीषा बिडवे यांच्या हत्याप्रकरणात आता पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे. मनीषा बिडवे या महिलेचा मोबाईल पोलिसांनी हास्तगत केला आहे. मनीषा बिडवे यांची हत्या करणारा आरोपी रामेश्वर उर्फ राण्या भोसले याच्या घरी हा मोबाईल सापडला आहे. सापडलेला मोबाईल डिस्चार्ज असून, या मोबाईलच्या माध्यमातून पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहे. मनिषा बिडवे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी केज येथील रहिवासी असून, तो संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या गावात उसतोडणीच्या कामाला होता, अशी माहिती समोर येत आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा मुकादम होता. तर बिडवे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार महादेव घुले हा देखील सुदर्शन घुले यांच्या गावचा रहिवासी आहे.