Pune District : बदलीचे आदेश कागदावरच! पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांना कार्यमुक्त कधी करणार?
Pune District : याच धोरणानुसार पुणे ग्रामीण पोलिस दलातील अनेक पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

शिरूर : पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियतकालानुसार बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी काढले असले, तरी बदली झालेले काही कर्मचारी व अधिकारी अद्याप जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बदलीचे आदेश निघूनही संबंधितांना तत्काळ कार्यमुक्त केले जात नसेल, तर बदल्यांचा नेमका उद्देश काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पोलिस दलामध्ये एखादा अधिकारी अथवा कर्मचारी दीर्घकाळ एकाच पोलिस ठाण्यात किंवा एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्यास स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे हितसंबंध निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून नियत कालावधीनंतर बदल्या केल्या जातात. याच धोरणानुसार पुणे ग्रामीण पोलिस दलातील अनेक पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (Pune District)
मात्र, बदलीचे आदेश निघाल्यानंतरही संबंधितांना जुन्या ठिकाणाहून कार्यमुक्त करण्यास विलंब होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदली आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
वर्षानुवर्षे एकाच पोलिस ठाण्यात किंवा संवेदनशील ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे हा प्रशासनाचा नियमित भाग आहे. मात्र बदलीचे आदेश काढल्यानंतर संबंधित कर्मचारी अथवा अधिकाऱ्याला नवीन नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी तातडीने कार्यमुक्त करणे अपेक्षित असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
‘आदेश निघाले आहेत, मग कार्यमुक्तीला विलंब का?’, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. बदलीचे आदेश केवळ कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा नियतकालिक बदली धोरणालाच हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे.
पोलिस दलातील काही कर्मचारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी पुढे येतात.
त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून प्रशासनाने योग्य संदेश दिला आहे. आता त्यांना तातडीने कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरत आहे. बदलीनंतरही जुन्याच ठिकाणी कर्मचारी कायम राहिल्यास बदली आदेशाचा प्रशासनावर व नागरिकांमध्ये काय परिणाम होणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आदेशांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने ‘झिरो पेंडन्सी’चा संदेश द्यावा (Pune District)
पोलिस दलात शिस्त आणि आदेशाची अंमलबजावणी यांना विशेष महत्त्व आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढलेल्या बदली आदेशांची अंमलबजावणी वेळेत झाली तरच प्रशासनातील शिस्त कायम राहील. त्यामुळे बदली झालेले कर्मचारी व अधिकारी जुन्या ठिकाणी किती दिवस राहणार आणि नवीन ठिकाणी कधी रुजू होणार, याबाबत स्पष्टता निर्माण करावी.
सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, नियतकालानुसार बदली झालेले आणि अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी व अधिकारी यांना कोणताही अनावश्यक विलंब न करता तातडीने कार्यमुक्त करावे आणि बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश प्रभावीपणे अंमलात आणावेत. बदलीचे आदेश झाले… आता कार्यमुक्तीची तारीख कधी? हा प्रश्न सध्या पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या कार्यपद्धतीकडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.





