नवी दिल्ली : रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्यांच्या तिकिट दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. ही भाडेवाढ 26 डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या नव्या भाडेरचनेनुसार, 215 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी सामान्य श्रेणीत कोणतीही भाडेवाढ होणार नाही. त्यामुळे कमी अंतराच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 215 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी सामान्य श्रेणीसाठी प्रति किलोमीटर 1 पैसा वाढ करण्यात आली असून मेल/एक्सप्रेस नॉन-एसी आणि एसी श्रेणीसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे वाढ लागू होईल. या भाडेवाढीमुळे भारतीय रेल्वेला 600 कोटींपेक्षा अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वेने निश्चित केलेल्या नव्या दरानुसार दिल्ली ते मुंबई प्रवासाच्या भाड्याचे गणित मांडल्यास हे अंतर साधारण १३८६ किलोमीटर आहे. सध्या ‘सीएसएमटीराजधानी एक्स्प्रेस’मध्ये ३-एसीचे भाडे ३१८० रुपये आहे. यामध्ये २ पैसे प्रति किलोमीटरच्या वाढीनंतर भाड्यात साधारण २७ रुपयांची वाढ होईल आणि तिकीट ३२०७ रुपये होईल. दरम्यान, ही यंदातील दुसरी रेल्वे भाडेवाढ आहे. याआधी 1 जुलै 2025 रोजीही तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैसा, तर एसी रेल्वेगाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढवण्यात आले होते. एकूणच, नव्या दरवाढीमुळे रेल्वेचा प्रवास महाग होणार असला, तरी रेल्वेच्या महसुलात मोठी भर पडणार आहे.