O Saathi Re Trailer: ‘ओ साथी रे’चा ट्रेलर रिलीज! अदिती-अविनाशच्या नात्यात येणार नवा ट्विस्ट; अर्जुन रामपालची एन्ट्री चर्चेत
O Saathi Re Trailer अदिती राव हैदरीने रोशनीच्या भूमिकेबद्दल सांगितले की, तिचे पात्र स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचे आहे. ती कोणाची मुलगी, पत्नी किंवा बहीण असण्यासोबतच स्वतःच्या इच्छा आणि भावना असलेली स्वतंत्र व्यक्तीही आहे.

O Saathi Re Trailer: ओटीटी विश्वात आणखी एक नवी ड्रामा सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी ‘ओ साथी रे’ या सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये अदिती राव हैदरी, अविनाश तिवारी आणि अर्जुन रामपाल महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रेम, लग्न, नात्यांमधील गैरसमज आणि भावनिक गुंतागुंत यांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ही सीरिज ४ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
‘ओ साथी रे’ची कथा अशा दोन व्यक्तींच्या आयुष्याभोवती फिरते, ज्यांचे वैवाहिक नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. अदिती राव हैदरी या सीरिजमध्ये रोशनीची भूमिका साकारत आहे, तर अविनाश तिवारी करणच्या भूमिकेत दिसणार आहे. करण आणि रोशनी आपले लग्न वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, त्याच काळात रोशनीच्या आयुष्यात प्रद्युम्नची एन्ट्री होते. ही भूमिका अर्जुन रामपाल साकारत आहे. त्यामुळे रोशनी आणि करणच्या नात्यात कोणते नवे वळण येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
करणच्या प्रेमामागे दडलेली असुरक्षितता
अविनाश तिवारीने आपल्या करण या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले की, या भूमिकेतील सर्वात खास गोष्ट म्हणजे करणची प्रेम करण्याची पद्धत. करणचे संपूर्ण जग रोशनीभोवती फिरते. त्याची ओळखही मोठ्या प्रमाणात रोशनीचा पती म्हणूनच जोडली गेलेली आहे.
करणला रोशनी आनंदी राहावी असे वाटते. मात्र, रोशनीच्या आनंदात स्वतःचे स्थान शोधताना त्याला अडचणी येतात. त्याच्या प्रेमामागे असुरक्षिततेची भावना आणि काही कमकुवत बाजूही आहेत. या भूमिकेमुळे प्रेमाचे वेगवेगळे रंग समजून घेण्याची आणि ते पडद्यावर साकारण्याची संधी मिळाल्याचे अविनाशने सांगितले.
View this post on Instagram
स्वतःची ओळख शोधणार रोशनी
अदिती राव हैदरीने रोशनीच्या भूमिकेबद्दल सांगितले की, तिचे पात्र स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचे आहे. ती कोणाची मुलगी, पत्नी किंवा बहीण असण्यासोबतच स्वतःच्या इच्छा आणि भावना असलेली स्वतंत्र व्यक्तीही आहे.
रोशनी ही परिपूर्ण व्यक्तिरेखा नाही. तिच्या निर्णयांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत ती स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करते. या भूमिकेतून एका महिलेच्या भावनिक गुंतागुंतीचा अनुभव घेता आल्याचे अदितीने सांगितले.
४ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित
‘ओ साथी रे’ या सीरिजची निर्मिती इम्तियाज अली, मोहित चौधरी आणि शिबाशीष सरकार यांनी विंडो सीट फिल्म्सच्या सहकार्याने केली आहे. इम्तियाज अली यांचे भाऊ आरिफ अली हेही या प्रकल्पात निर्माते म्हणून सहभागी आहेत.
आरिफ अली यांनी यापूर्वी ‘शी’ आणि ‘लेकर हम दीवाना दिल’ यांसारख्या प्रकल्पांची निर्मिती केली आहे. आता ‘ओ साथी रे’मधून प्रेम आणि नात्यांची एक वेगळी कहाणी प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही सीरिज ४ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.





