शारजा – ट्रेलब्लेझर्सच्या सोफिया एक्केलस्टोन, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी व दीप्ती शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीसमोर वेलॉसिटीचा डाव केवळ 47 धावांत संपुष्टात आला. विजयी लक्ष्य 8 व्याच षटकांत 1 गडी गमावून 49 धावा फटकावून पार करत ट्रेलब्लेझर्सने सहज विजयाची नोंद केली.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना कर्णधार स्मृती मानधना केवळ 6 धावांवर बाद झाली. त्यानंतर मात्र, दिंड्रा डॉटिन व रिचा घोष यांनी दुसऱ्या गड्यासाठी 37 धावांची भागीदारी करत ट्रेलब्लेझर्सचा विजय साकार केला. डॉटिनने नाबाद 29 तर, रिचाने नाबाद 13 धावा केल्या. ले कासपेरेकने मानधनाला बाद करत सामन्यात एकमेव गडी बाद केला. मात्र, त्यानंतर ट्रेलब्लेझर्सने सहज विजय प्राप्त केला.
वेलॉसिटीची कर्णधार मिताली राज हिने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय साफ चुकला. ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजांनी अत्यंत अचूक गोलंदाजी केली. वेलॉसिटीच्या मितालीसह शेफाली वर्मा, डॅनियल वॅट, वेदशा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा, सुन लुस, सुश्री दिव्यदर्शनी या सर्व प्रमुख फलंदाजांना अपयश आल्याने त्यांचा डाव 16 व्या षटकात केवळ 47 धावांतच संपला.
शेफाली, शिखा पांडे व ले केसपेरेक यांनाच दोन अंकी धावा करता आल्या. त्यांच्या 8 फलंदाजांना दोन अंकी धावाही करता आल्या नाहीत.कर्णधार व अत्यंत अनुभवी खेळाडू मितालीला तर भोपळाही फोडता आला नाही.
इंग्लंडची सोफिया एक्केलस्टोनने मितालीसह वेदा, सुषमा व जहांआरा आलम यांना बाद करत त्यांच्या आव्हानातील हवाच काढून टाकली. तिला योग्य साथ देताना राजेश्वरी व झुलन यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. दीप्ती शर्माने एकता बिश्तचा अडसर दूर केला. एकवेळ बिनबाद 17 अशी स्थिती होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या फलंदाजांना ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजीचा सामनाच करता आला नाही.
सोफियाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती पाहता या खेळपट्टीकडून कोणत्याही गोलंदाजाला काहीही मदत मिळाली नसली तरीही वेलॉसिटीच्या फलंदाजांनी अत्यंत बेजबाबदार फटके मारुन आपल्या विकेट गमावल्या.
या स्पर्धेचे सलग तिसरे विजेतेपद मिळवण्याच्या जिद्दीने सहभागी झालेल्या सुपरनोव्हाज संघाचा बुधवारी पराभव करत वेलॉसिटीने दणदणीत विजयासह यशस्वी सलामी या स्पर्धेत दिली. मात्र, तोच हा संघ का असा प्रश्न निर्माण व्हावा इतकी निराशाजनक कामगिरी त्यांची गुरुवारी झालेल्या ट्रेलब्लेझर्सविरुद्धच्या सामन्यात होती.
संक्षिप्त धावफलक – वेलॉसिटी- 15.1 षटकांत सर्वबाद 47 धावा. (शेफाली वर्मा 13, ले केसपेरेक नाबाद 11, शिखा पांडे 10, सोफिया एक्केलस्टोन 3-9, झुलन गोस्वामी 2-13, राजेश्वरी गायकवाड 2-13, दीप्ती शर्मा 1-8).
व्याप्ती कशाला वाढवायची…
एकीकडे महिलांच्या आयपीएलची व्याप्ती आणखी वाढवली पाहिजे, अशी मते व्यक्त होत असताना याच महिला खेळाडूंनी अत्यंत निराशाजनक खेळ करत या प्रायोगिक तत्त्वावरच्या आयपीएलचेही पुढील काळात आयोजन करावे का, असा प्रश्न बीसीसीआयसमोर उभा राहणार आहे. या स्पर्धेतील संघ व सामने दोन्हींत वाढ करण्याची मागणी होत असतानाच या पद्धतीचा खेळ होत असेल तर बीसीसीआय पुढील काळात या स्पर्धेला कितपत पाठिंबा देईल, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. हा सामना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासह अन्य देशांच्या संघांचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंमध्ये होत आहे का, शालेय स्तरावरील खेळाडूंमध्ये होत आहे, असा प्रश्न पडावा इतकी दारुण कामगिरी वेलॉसिटीकडून झाली आहे.