पुसेगाव – नवरात्रोत्सव संपला की यात्रांना सुरुवात होते. यात्रांचा सर्वाधिक काळ असतो तो उन्हाळ्याच्या कालावधीत. प्रशासनाकडून घातल्या जाणाऱ्या निर्बंधांमुळे या यात्रांचा बाज हरवू लागला आहे. विशेष म्हणजे यात्रा म्हटलं की बैलगाड्यांच्या शर्यती ठरलेल्या. परंतु, बैलगाडी शर्यतीवर प्रशासनाने बंदी घातली आणि ग्रामीण यात्रांचा बाजच हरवला. सध्या शर्यतींबाबतचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत अडकला असल्याने न्यायालयीन प्रक्रियेकडे शौकिनांनाच्या नजरा लागला आहेत. सध्या तरी ग्रामीण भागातील यात्रा शर्यतींविना ओस पडल्या आहेत. बैलगाड्यांच्या शर्यतीवरील शासनाने घातलेल्या बंदीने शेतकऱ्यासह सर्वच स्तरांतून प्रचंड नाराजी आहे. ग्रामीण भागातील लोकांचा पारंपरीक खेळ असलेल्या बैलगाड्यांच्या शर्यती केवळ मनोरंजनासाठी नव्हत्या तर त्यावर कित्येक कुटुंबांचा उदरनिर्वाह आधारीत होता. त्यात प्रामुख्याने जातीवंत जनावरांचा सांभाळ करणारा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. तमिळनाडूसारख्या राज्यात जलतट्टूला मान्यता मिळत असेल तर मग महाराष्ट्रातील बैलगाड्या शर्यतींना मान्यता का दिली जात नाही, असा प्रश्न संबंधित शेतकरी तसेच शौकिनांना पडला आहे. विशेष म्हणजे बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा लवकर सुरू व्हाव्यात, शासनाने तातडीने योग्य ती नियमावली तयार करावी यासाठी शौकीनांनी साकडेच घातले आहे. ग्रामीण भागातील यात्रांचा अविभाज्य अंग असलेल्या या बैलगाड्यांच्या शर्यतींचा बाज काही निराळाच असतो. बाजारूपणाने भरवलेला बैलगाड्यांचा अड्डा आणि देवदेवतांच्या यात्रा काळात मोठ्या भावभक्तीने भरवलेला बैलगाड्यांचा अड्डा यात मोठा फरक असतो. पुसेगावसारख्या मोठ्या यात्रेच्या बैलगाडी आखाड्यात एक नंबरचे बक्षीस पटकवणाऱ्या बैलजोडीला राज्यात या क्षेत्रात मोठा मानच तर मिळतोच पण त्या बैलजोडीची व त्यांना सांभाळंणाऱ्या शेतकऱ्याची किंमतही चांगलीच वधारली जाते. शर्यतीत पळणाऱ्या अशा जातीवंत, चपळ बैलांची, खोंडांची पैदास करणाऱ्या देशी खिलार गाईला त्यामुळे तर शेतकरी वर्गात चांगली मागणी असते. पण गेल्या काही दिवसांपासून शर्यतीवर बंदी असल्याने देशी गाईंची मागणी कमी होऊ लागली आहे. शेतीत ट्रॅक्टर आल्याने खोंड, बैलांकडेही शेतकरी वर्गाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे एकंदर जातिवंत खिलार जनावरे व ती पैदास करणाऱ्या जाती हळूहळू नष्ट होण्याच्याच मार्गावर आहेत.