Satara News : दुर्दैवी घटना! फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Satara News : एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

फलटण : खामगाव (ता. फलटण) येथे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आलेल्या आणि एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
खामगाव येथे आज बुधवारी पहाटे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील खासगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ राहणाऱ्या शिंदे कुटुंबावर अक्षरशः काळाने घाला घातला. बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमध्ये अचानक प्रवाह आल्याने प्रथम पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८) यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले आणि काही क्षणांतच चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी महादेव पिसे, ओंबासे आणि अडसूळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, घराबाहेरील वायरमध्ये विद्युत प्रवाह कसा आला आणि यामागील नेमके कारण काय, याचा सखोल तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.
एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून शिंदे कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या जात आहे.





