प्रभात वृत्तसेवा पुणे – कार्तिक वारीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांची होणारी गर्दी विचारात घेऊन विश्रांतवाडी ते आळंदी रस्ता, तसेच नगर रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या भागातील वाहतूक बदल २१ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. ‘कार्तिकी एकादशी म्हणजेच कार्तिक वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांची मोठी गर्दी होते. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून वारकरी बांधव येतात. आठवडाभर श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांची गर्दी असते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या येरवडा आणि वाघोली विभागाकडून वाहतूक बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.विश्रांतवाडीतून बोपखेल फाटामार्गे आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विश्रांतवाडीतून आळंदीकडे जाणाऱ्या ट्रक, कंटेनर चालकांनी येरवडा, खडकीतील होळकर पुलावरून जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने इच्छितस्तळी जावे. नगर रस्त्यावरील तुळापूर फाटामार्गे आळंदी मरकळकडे जाणाऱ्या जड वाहनांनी शिक्रापूरमार्गे चाकणकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. आळंदी रस्ता, तसेच तुळापूर फाटा परिसरातील वाहतूक बदल २१ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.