पिंपरी – महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली. पोलीस अंमलदार प्रकाश नाईकरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन माणिक शिंदे (वय 34, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश नाईकरे हे चाकण वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. पुणे नाशिक महामार्गावर कुरूळी गावात ते कर्तव्यावर असताना शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास आरोपी चेतन शिंदे दुचाकीवरून आला. त्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. त्याला नाईकरे यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेतन शिंदे याने नाईकरे यांना बेदम मारहाण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.