वाहतूक कोंडी करणाऱ्या ट्रॅव्हल्सना यापुढे दणका

महापालिकाच लावणार जॅमर, 25 हजार रुपयांचा दंड
पुणे – रस्ते, मेट्रो आणि पुलांच्या बांधकामांमुळे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले असताना, प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस त्यामध्ये भर घालत आहेत. या बसेसना (ट्रॅव्हल्स) आता महापालिकाच “जॅमर’ लावणार आहे. हा जॅमर’ काढण्यासाठी बसचालकाकडून जागेवरच 25 हजार रुपये वसूल केले जाणार आहेत. एवढेच नव्हे, तर ती बस पुन्हा चुकीच्या ठिकाणी लावल्यास ती थेट जप्तच केली जाणार आहे.
खासगी प्रवासी बसेसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून या बसचालकांचे बेदरकारपणे वाहन चालवणे, नियमांचे उल्लंघनही वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईत राजकीय हस्तक्षेप आणि दमदाटी होण्याच्या शक्यतेने पोलिसांसमोर बसेस रोखण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर (हडपसर), पुणे रेल्वेस्थानक, शिवाजीनगर, संगमवाडी, वाकडेवाडी भागात ही कारवाई होणार असून, त्यासाठी रात्रीच्या वेळी पथके नेमण्यात आली आहेत, असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.





