Traffic Jam – खेड तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावर अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात आले होते. फुटपाथ व पीव्ही ब्लॉकमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली होती. मात्र सध्या रस्त्यालगत अतिक्रमण, हातगाड्या, टपर्या आणि अनधिकृत पार्किंगमुळे रस्त्याचे मूळ स्वरूपच बदलले आहे. वाडा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टपर्या व हातगाड्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांसाठी असलेला फुटपाथही व्यापार्यांनी ताब्यात घेतला असून तेथे साहित्य व बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे, काही वाहनचालकांनी रस्त्यालगत कायमस्वरूपी पार्किंग केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या परिसरात शाळा, खासगी क्लासेस, पंचायत समिती, प्रांत कार्यालय, बँका व हॉटेल्स असल्याने दिवसभर मोठी वर्दळ असते. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी येणार्या चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. एसटी व औद्योगिक वसाहतीतील कर्मचार्यांची वाहतूक करणार्या मोठ्या वाहनांना या रस्त्यावरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, काही ठिकाणी अतिक्रमणासाठी स्थानिक स्तरावर ‘हप्ते’ दिल्याच्या चर्चाही रंगत आहेत. तसेच काही वाहनांवर कारवाई होत नसल्याने पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “शहरात नवीन टपर्यांना पूर्णतः बंदी असून जुन्या टपरीधारकांना पर्यायी जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणार्यांवर लवकरच कडक कारवाई केली जाईल. तसेच वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात येणार असून रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.” – मंगेश गुंडाळ, नगराध्यक्ष राजगुरूनगर