Jamkhed News : ऐन सणासुदीच्या काळात जामखेड शहरात ट्राफिक जॅम! सौताडा-जामखेडचे काम थंडावले; ठेकेदार सुस्त

जामखेड : सध्या दीपावलीनिमित्ताने शहरातील नगर रोड, खर्डा चौक, जयहिंद चौक, बीड कॉर्नरवर वाहनाचे प्रचंड ट्राफिक जॅम होत असून सौताडा जामखेड महामार्गाचे काम पूर्णपणे थंडावले आहे. ठेकेदार सुस्त झाला असून याचा फटका जामखेडकरांना बसत आहे. ऐन सणासुदीत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचारी याना रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करताना दिसत होते.
गेल्या तीन वर्षांपासून जामखेड सौताडा महामार्गाचे काम सुरु असून नगर रोड ते खर्डा चौकापर्यंत काम पूर्ण झालेले आहे. मात्र खर्डा चौक -जयहिंद चौक-बीड कॉर्नर -ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतचे काम गेल्या दोन वर्षपासून अडकवून ठेवण्यात आले आहे. रस्त्याचे मोजमाप देखील अनेक वेळा करण्यात आले असून नकाशे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडे असतानाही ज्या ठिकाणी काही प्रमाणात अतिक्रमणे असतानादेखील काम बंद ठेवण्यात आले आहे.
आमदारांच्या सूचनांना केराची टोपली
नेमका काम कोणाच्या सांगण्यावरून काम बंद ठेवण्यात आले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार रोहित पवारांनी आमसभेत राष्ट्रीय महामार्ग व सबंधित ठेकेदार यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस अतिक्रमणे काढून कामे सुरु करण्याचे सूचना दिल्या होत्या. मात्र, ठेकेदारांनी आमदार रोहित पवार यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली असून खर्डा चौक ते बीड रोड पर्यांतचे काम पूर्णपणे थंडावले आहे.
लक्ष देण्याची मागणी
त्यातच सध्या दीपावली सणानिमित्ताने बीड, धाराशिव, तुळजापूर, लातूर, परळी, यासह अन्य भागाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे शहरात खर्डा चौक ते बीड रोड पर्यंतच्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून तासन्तास वाहने एकच ठिकाणी उभी राहत आहेत. यामुळे वाहनधारकासह जामखेडकर प्रचंड त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनासह सभापती राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.





