Pimpri : सृष्टी चौकात वाहतूक कोंडी; वाहनचालक त्रस्त

सांगवी : पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक हा सध्या वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू ठरला आहे. रोजच्या रोज निर्माण होणाऱ्या गोंधळामुळे चाकरमान्यांना ५ ते १० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तब्बल एक ते दीड तास वेळ वाया घालवावा लागतो. मात्र, या गंभीर समस्येकडे वाहतूक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे.
औंध, सांगवी, कासारवाडी, वाकड-भोसरी बीआरटीएस रस्ता आणि पिंपळे सौदागरकडून येणारी वाहने सृष्टी चौकात एकत्र येतात. परिणामी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. विशेषतः सायंकाळी सहा वाजल्यानंतर ही परिस्थिती आणखी बिकट होते.
पदपथ आणि रस्त्यावर हातगाड्यांचे अतिक्रमण, चौकात बेशिस्तपणे उभ्या असलेल्या रिक्षा, चौकात असलेला बसथांबा, तसेच रस्त्यावर अयोग्य पद्धतीने लावलेली वाहने, यामुळे सृष्टी चौक हा कोंडीत अडकलेला चौक झाला आहे. पादचाऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.
या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा नियमित बंदोबस्त नसल्यामुळे अनेकदा ही वाहतूक कोंडी सामाजिक कार्यकर्त्यांना हस्तक्षेप करून सोडवावी लागते. नियमित वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हावी”, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालकांकडून होत आहे.
सृष्टी चौकात वाहनांची गर्दी रोज असते. पोलीस दिसत नाहीत. अर्धा तास एका सिग्नलला उभं राहतोय, याचा कंटाळा आलाय!,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. महापालिका व वाहतूक पोलीस विभागाने या चौकातील अतिक्रमण हटवून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
या रस्त्याने नियमित ये-जा असते. औंधवरून लवकर येऊनही पिंपळे गुरवमध्ये वाहतूक कोंडीत अडकावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ५ ते १० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तब्बल एक ते दीड तास वेळ वाया घालवावा लागतो. यामुळे आधीच महाग झालेले इंधन जास्त लागते. हे चित्र बदलायला हवे.
– वाहतूक कोंडीने त्रस्त वाहनचालकसृष्टी चौकात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे दररोज नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. बेशिस्तपणे लावलेली वाहने, आडव्या तिडव्या लागलेल्या रिक्षा, तसेच बसथांबाही भर चौकात असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. परिणामी वयस्कर व्यक्ती, महिला व लहान मुलांना अक्षरशः जीव मुठीमध्ये घेऊन ये जा करावी लागते. वाहतूक पोलिसांनी इथल्या वाहतुकीचे काटेकोर नियोजन करून सिग्नलची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
– सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्तेयाकडे हवे प्रशासनाचे लक्ष
दैनंदिन प्रवासात वेळेची नासाडी
वाहतूक पोलिसांचा चौकात अभाव
रस्त्यावर हातगाड्यांचे अतिक्रमण सुरूच
पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
सामाजिक कार्यकर्तेच कोंडी सोडवतात
तात्काळ वाहतूक नियमनाची गरज





